अणदूर (ता. तुळजापूर) : गावाच्या जुन्या चिवरी रस्त्याचा इतिहास पाहता तो ‘अर्धवट रस्त्यांचा बादशहा’ म्हणावा लागेल. गेल्या २५ वर्षांत या एक ते दीड किमी रस्त्यावर एवढा निधी खर्च झाला आहे की, तो वाचून अर्थसंकल्प बनवणारेही चक्रावतील! मात्र, दुर्दैवाने हा रस्ता अजूनही ‘संपला’ नाही.
रस्त्याच्या पहिल्या काही मीटरवर काम जोरात सुरू असते, त्यानंतर अचानक निधी आडवा येतो (किंवा कुणाच्या तरी घरासमोरच संपतो). या वर्षी ‘दिवाळी बक्षीस’ म्हणून आणखी ३० लाखांचा निधी आला असून, ‘डांबरीकरण’ करायचे असल्याचे सांगितले जात आहे. पण तात्पुरत्या ‘खडी-राडा-मुरूम’च्या लाटांनी आधीच हा रस्ता एका नव्या अवतारात दिसू लागला आहे.
“खड्ड्यांवरून ये-जा करणाऱ्यांना नमन आणि खड्डे बुजवण्याचा निधी लाटणाऱ्यांना जय!” असे घोषवाक्य येथे लागू पडते. गावकऱ्यांच्या मते, गावातील दोन गुत्तेदार कार्यकर्त्यांची कामं तपासली, तर नवी कामं कधीही सुरू होतील. कारण जुन्या कामांमधून टिकलेले काहीच नाही.
गावातील श्री खंडोबाच्या तीर्थक्षेत्रासाठी अजूनही ‘एक रुपयाही’ मंजूर झालेला नाही, मात्र, या ‘रस्त्याच्या पायथ्याशी’ कार्यकर्त्यांची तिजोरी मात्र चांगलीच भरत आहे. गावातील काही अनुभवी नागरिकांनी आता या रस्त्याला ‘महापुरुष’ दर्जा देण्याची मागणी केली आहे. कारण हा रस्ता कधीही पूर्ण होणार नाही, पण यावर निधींची वर्षानुवर्षे पूजा होतच राहील!