तुळजापूर: “शहरातील अवैध धंदे बंद करा, पोलिसांनो जागे व्हा!” अशा घोषणा देत, निवेदनं सादर करत, पत्रकार परिषदा गाजवणारे काँग्रेसचे निष्ठावान(?) कार्यकर्ते आणि पदाधिकारी, श्रीमान अमोल माधवराव कुतवळ, हे स्वतःच मटका व्यवसायाचे महारथी निघाले आहेत! या धक्कादायक बातमीने तुळजापूर तालुक्यात सध्या ‘खळबळ’ नाही, तर ‘धुमाकूळ’ घातला आहे.
गेल्या चार महिन्यांपासून कुतवळ साहेब शहरातल्या अवैध धंद्यांविरोधात इतका जोरकस आवाज उठवत होते की, जणू काही ते एकटेच तुळजापूरचे ‘सिंघम’ आहेत! तुळजापूर ड्रग्ज प्रकरणानंतर तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना हाताशी धरून त्यांनी आंदोलनांचा असा काही धडाका लावला होता की, विचारता सोय नाही. “शहरातील अवैध धंद्यांना कोणाचा वरदहस्त आहे?” असा गंभीर प्रश्न ते वारंवार विचारत होते. आता कळतंय, तो ‘वरदहस्त’ बहुतेक त्यांच्याच डोक्यावर होता की काय, कोण जाणे!
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाला निवेदनं देऊन, फोटोसेशन करून, वर्तमानपत्रात बातम्या पेरण्यात कुतवळ साहेब आघाडीवर होते. जणू काही अवैध धंद्यांविरोधात त्यांनी ‘धर्मयुद्ध’च पुकारलं होतं.
पण म्हणतात ना, “बकरे की माँ कब तक खैर मनाएगी?” शनिवारी रात्री पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्वतः सूत्रे हाती घेत, खास पथकासह हॉटेल राज पॅलेसवर असा काही ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला की, सगळा बनाव उघड झाला. तिथे चक्क मटक्याचा अड्डा सुरू होता आणि या अड्ड्याचे ‘सूत्रधार’ कोण? तर आपले लाडके अमोल कुतवळ! त्यांच्यासोबत भाजपचे विनोद गंगणे आणि सचिन पाटील हेदेखील या ‘पवित्र’ कार्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. राजकारणातले हे ‘अमोल’ त्रिकुट पाहून पोलीसही चक्रावले असतील!
या प्रकरणी एकूण ३३ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तक्रार करणारेच जेव्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहतात, तेव्हा जनतेचा संताप अनावर होणं स्वाभाविक आहे. “साहेब, आंदोलनाच्या नावाखाली स्वतःचेच ‘अवैध’ दुकान थाटले होते काय?” असा खोचक सवाल आता तुळजापूरकर विचारू लागले आहेत.
या प्रकरणामुळे काँग्रेस पक्षाची प्रतिमा तर ‘अमोल’ पद्धतीने धुळीस मिळाली आहेच, पण आता तपासात आणखी कोणकोणते ‘अमोल’ मोती बाहेर येतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे डोळे लागून राहिले आहेत. तुर्तास, “अवैध धंदे बंद करा” या घोषणेला एक नवीन विनोदी उपमा मिळाली आहे, हे मात्र नक्की!