धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालय हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास तीन वर्षासाठी वर्ग करण्यात आले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाचा सर्व कर्मचारी वर्ग आता वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता यांच्या अधिपत्याखाली आहे. असे असताना जिल्हा शल्य चिकित्सक आणि अधिष्ठता यांच्या अधिकारावरून गेले वर्षभर वाद सुरु आहे., ‘मी बडा की तू बडा’ या वादात रुग्णाचे मात्र हाल सुरु आहेत.
महाराष्ट्रात मराठवाडा आणि मराठवाडयात धाराशिव जिल्हा सर्वात मागास आहे. नीती आयोगाच्या मागास यादीत धाराशिव जिल्हा तिसऱ्या क्रमांकवर आहे. उस्मानाबाचं नामांतर धाराशिव झालं पण समस्या जैसे थे आहेत. गतवर्षी मोठा गाजावाजा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले. माझ्यामुळेच शासकीय रुग्णालय मंजूर झाले म्हणणारे राजकीय पुढारी मात्र मेडिकल कॉलेजच्या समस्या जाणून घ्यायला तयार नाहीत .
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास स्वतंत्र इमारत नाही. इमारत कुठे बांधायची याचा वाद गेली दोन वर्षे सुरु आहे. पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत एक जागा सुचवतात तर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील हे वेगळी जागा सुचवतात. या दोघांतील छुपा वाद आणि राजकीय वर्चस्व यामुळे जागेचे भिजत घोंगडे धूळ खात पडले आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( ITI ) ची ३० एकर आणि पाटबंधारेची २० एकर अशी ५० एकर जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देण्यात आल्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगर मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याचे आ. राणा जगजितसिंह पाटील यांचे म्हणणे आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या इमारतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – रुग्णालय सुरु आहे. त्यांचा सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग वैद्यकीय महाविद्यालयास तीन वर्षासाठीव वर्ग करण्यात आला आहे. एकीकडे जागेचा वाद तर दुसरीकडे जिल्हा रुग्णालयातील शल्य चिकित्सक आणि अधिष्ठता यांच्यातील पोरकट वाद रुग्णाच्या मुळावर उठला आहे. मेडिकल कॉलेजची दुसरी बॅच सुरु झाली असली तरी जिल्हा शल्य चिकित्सक आणि अधिष्ठता यांच्या अधिकारावरून ‘ तू तू , मै मै ‘ सुरू आहे.
जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या अधिपत्याखाली उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय येतात तर अधिष्ठता यांच्या अधिकपत्याखाली फक्त जिल्हा शासकीय रुग्णालय येते. तुळजापूर, उमरगा, परंडा, कळंब, नळदुर्ग येथे उपजिल्हा रुग्णालय तर भूम, लोहारा, तेर, वाशी, बेंबळी येथे ग्रामीण रुग्णालय असून ते जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अधिकपत्याखाली आणि डॉ. तानाजी सावंत यांच्या आरोग्य मंत्र्यालयाकडे जोडण्यात आले आहे तर जिल्हा शासकीय रुग्णालय हे वैद्यकीय महाविद्यालयास वर्ग करण्यात आल्याने ते हसन मुश्रीफ यांच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे जोडण्यात आले आहे.
उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात नोंदणी फी पासून सर्व तपासण्या आणि उपचार मोफत आहेत तर जिल्हा रुग्णालय हे मेडिकल कॉलेजकडे वर्ग असल्याने येथे नोंदणी फी पासून सर्व तपासण्या आणि उपचारासाठी पैसे मोजावे लागत आहेत. पण येथे कसल्याही सोयी सवलती, औषधे नाहीत. जिल्हा रुग्णालय सध्या राम भरोसे सुरु आहे. वैद्यकीय अधिकारी वेळेवर येत नाहीत, आले तर थांबत नाहीत, त्यांचे सर्व लक्ष स्वतःच्या खासगी हॉस्पिटलवर असते. साधा वार्ड बॉय ( मामा ) देखील येथे हजर नसतो, त्यामुळे सिरीयस पेशंटला नातेवाईक स्वतः व्हील चेअर ओढत वार्डमध्ये नेत असल्याचं चित्र आहे. सिटी स्कॅन, सोनोग्राफी सोडा साधी पित्ताची गोळी, ors सुद्धा येथे मिळत नाही.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता मॅडम म्हणतात , आम्हाला अजून इमारत नाही. अधिकारी, कर्मचारी नाही, जिल्हा रुग्णालय तीन वर्षासाठी भाड्याने घेतला असला तरी तेथील अधिकारी, कर्मचारी आमचे ऐकत नाहीत. जिल्हा शल्य चिकित्सक म्हणतात जिल्हा रुग्णालय आमच्या अंडर येत नाहीत. अधिष्ठता मॅडम मुख्य आहेत. नेमके दुखणं कुठं आहे हे समजायला तयार नाही. त्यासाठी आता वर वरची मलमपट्टी नव्हे आता ऑपरेशन करण्याची गरज आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री तानाजी सावंत ( शिवसेना शिंदे गट ) आणि भावी पालकमंत्री राणा जगजितसिंह पाटील ( भाजप ) यांच्या राजकीय वादात आणि राजकीय वर्चस्वात मेडिकल कॉलेजच्या जागेचे भिजत घोंगडे एकदा पवित्र गंगा नदीत धुवून काढा आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना सर्व सोयी सवलती पुरवा हीच मराठवाडा मुक्ती संग्रामच्या खऱ्या शुभेच्छा ठरतील आणि उस्मानाबाचे धाराशिव झाल्याचा खरा आनंद लोकांना मिळेल.
– सुनील ढेपे
संपादक, धाराशिव लाइव्ह
मो . ७३८७९९४४११