उमरगा : उमरगा शहरातील एकोंडी रोडवरील दिपाली किरणा दुकानात सोमवारी सकाळी साडेआठ वाजता दोन अनोळखी इसमांनी चॉकलेट मागून दुकानाचे मालक मुरलीधर पाटील यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरलीधर पाटील हे त्यांच्या दुकानात असताना दोन अनोळखी इसम मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी पाण्याची बाटली आणि चॉकलेट मागितले. पाटील हे त्यांना चॉकलेट देत असतानाच त्यातील एकाने कटरने पाटील यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन कापली आणि दोघेही पसार झाले.
या घटनेनंतर मुरलीधर पाटील यांनी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी भादंविच्या कलम 304, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला असून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
उमरगा बाजार समितीत सोयाबीन कट्ट्यांची चोरी
उमरगा- उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने 53 सोयाबीनचे कट्टे चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सुमारे 65,000 रुपयांचे नुकसान झाले असून उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय शिरगुरे यांचे बाजार समिती परिसरात आडत दुकान आहे. शनिवारी संध्याकाळी दुकान बंद करून ते घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यावर त्यांना दुकानाचे कुलूप तोडलेले आढळले. आत तपासणी केली असता 53 सोयाबीनचे कट्टे चोरीला गेल्याचे लक्षात आले.
याप्रकरणी दत्तात्रय शिरगुरे यांनी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंविच्या कलम 331(3), 331(4), 305 अन्वये गुन्हा नोंदवला असून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.