धाराशिव: मंडळी, एक खुशखबर आणि थोडी हैराण करणारी खबर! यवतमाळ जिल्ह्यातल्या टिपेश्वरच्या जंगलातून एक वाघोबा महाशय तब्बल ५०० किलोमीटरची ‘वॉक’ करत आपल्या धाराशिव जिल्ह्यात ‘पर्यटनाला’ आले आहेत. पण गंमत म्हणजे, हे महाशय २३ डिसेंबर २०२४ रोजी पहिल्यांदा दिसल्यापासून आजतागायत म्हणजे तब्बल चार महिने झाले, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत चक्क लपाछपी खेळत आहेत! जणू काही ते म्हणतायत, “पकडून दाखव!”
‘आज इथे, तर उद्या तिथे’ – वाघोबाचा अनोखा टूर प्लॅन!
सुरुवातीला या ‘व्हीआयपी टुरिस्ट’ला शोधायला ताडोबाच्या जंगलातून २५ जणांची तगडी टीम आली होती. पण बिचाऱ्यांची जंगल सफारीच झाली आणि वाघोबा काही सापडले नाहीत. त्यानंतर पुण्यातून खास ‘टायगर ट्रॅकिंग स्पेशालिस्ट’ टीम दाखल झाली. अहो, ही टीम येऊन पण तीन महिने उलटले, पण वाघोबा काही त्यांच्याही हाती लागेना! मध्ये तर काही दिवस वाघोबा दिसेनासे झाले, तेव्हा टीमला वाटलं, ‘चला, वाघ कंटाळून दुसरीकडे गेला असेल किंवा…’ (पुढे बोलायची गरज नाही!). पण नाही! आमच्या वाघोबाने बार्शी तालुक्यातल्या एका गावात पुन्हा दर्शन देऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आणि टीमला पुन्हा कामाला लावलं! जणू काही म्हणतोय, “अरे, मी इथेच आहे, जरा फ्रेश व्हायला गेलो होतो!”
६०-७० जनावरांचा ‘स्नॅक्स ब्रेक’!
आतापर्यंत या प्रवासात वाघोबाने जवळपास ६० ते ७० जनावरांवर ताव मारून आपला ‘प्रवासाचा खर्च’ वसूल केला आहे, असं दिसतंय. म्हणजे पर्यटन पण आणि पोटपूजा पण!
खर्चाचा आकडा मोठा, पण हाती भोपळा!
सर्वात मोठी कॉमेडी म्हणजे, या वाघोबाला शोधण्यासाठी तैनात असलेल्या टीमवर दर महिन्याला तब्बल १० लाख रुपये खर्च होत आहेत! म्हणजे ४ महिन्यांत जवळपास ४० लाख रुपये स्वाहा! आणि हाती काय? तर भोपळा! 🎃
वन विभागाचे कर्मचारी मात्र डोक्याला हात लावून विचार करत आहेत, “खरंच, हा गेला वाघ कुणीकडे?” कदाचित वाघोबा पुढच्या ५०० किलोमीटरच्या प्रवासाचं प्लॅनिंग करत असेल! बघूया, ही लपाछपी अजून किती दिवस चालते!