नागपूर: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत निवेदन केले. या प्रकरणाची एसआयटी व न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा त्यांनी केली असून ही चौकशी 3 ते 6 महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असे ते म्हणाले.
या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बीडच्या पोलिस अधीक्षकांची बदली करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितले. तसेच मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून 10 लाख रुपयांची मदत करण्याचीही घोषणा त्यांनी केली.
देशमुख यांच्या हत्येला 6 डिसेंबर रोजी झालेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आवाडा एनर्जी कंपनीच्या कार्यालयावर झालेल्या मारहाणीच्या घटनेत देशमुख यांनी मध्यस्थी केली होती. या घटनेनंतर 2 दिवसांनी म्हणजे 9 डिसेंबर रोजी देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली.
देशमुख यांना आरोपींनी गाडीतच मारहाण केली. त्यानंतर गाडीतून खाली उतरवून मारहाण करण्यात आली. ज्यावेळी देशमुख यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले त्यावेळी आरोपी त्यांना सोडून पळून गेले. या सर्व प्रकरणात सातत्याने सरपंचांचा भाऊ हा या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे यांच्या संपर्कात होता, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कळंबची ती महिला कोण ?
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणी संपूर्ण घटनाक्रम सभागृहाला सांगून, आरोपींनी हत्या करण्यापूर्वी मोठा कट रचला होता, असे सांगितले. धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील एका महिलेला समोर करून देशमुख यांच्याविरुद्ध छेडछाड आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा आरोपीचा प्रयत्न होता. ती महिला कोण आहे, हे शोधून काढा आणि तिला देखील सहआरोपी करा, अशी मागणी देखील आ. धस यांनी केली आहे.
या नवीन खुलासामुळे कळंबची ती महिला नेमकी कोण ? अशी चर्चा सुरु आहे. सदर महिला ब्लँकमेलर असून, तिने अनेकांवर विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे.