धाराशिव: तुळजापूर येथील गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विधानसभा अधिवेशनात आमदार पाटील यांनी या गंभीर विषयावर मौन बाळगल्याचा आरोप करत, प्रकरणाला २ महिने उलटूनही २१ आरोपी फरार असल्याबद्दल त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि दबावाखाली काम करत असल्याचा संशय व्यक्त केला.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, “हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मी स्वतः लोकसभेत प्रश्न मांडला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून निवेदन दिले. आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत आवाज उठवला, पण त्याच मतदारसंघाचे आमदार राणा पाटील यांनी अधिवेशनात एकदाही तोंड उघडले नाही. हे चिंताजनक आहे.”
प्रकरणातील तपासावर भाष्य करताना ते म्हणाले, “या प्रकरणात एकूण ३५ आरोपी असून, त्यापैकी २१ आरोपी अजूनही फरार आहेत. घटनेला २ महिने झाले तरी एकाही आरोपीला अटक का झालेली नाही? पोलिसांवर नेमका कुणाचा दबाव आहे? जर पोलिसांना फ्री हँड (मोकळीक) दिला, तर आरोपी लगेच अटक होतील. एक खासदार म्हणून सोडा, पण एक पालक म्हणून मला याची चिंता वाटत आहे.”
या प्रकरणात श्री तुळजाभवानी मंदिरातील १७ पुजाऱ्यांचा सहभाग असल्याच्या बातम्या येत असल्याबद्दल बोलताना खासदार निंबाळकर यांनी सांगितले की, “मी स्वतः जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी बोललो. त्यांनी अशी कोणतीही यादी प्रशासनाने मागवली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मग पुजाऱ्यांची बदनामी करून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न कोण करत आहे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.या प्रकरणातील आरोपीना मकोका लावावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
खासदार निंबाळकर यांच्या या टीकेमुळे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाला राजकीय वळण लागले असून, फरार आरोपींना कधी अटक होणार आणि पोलिसांवरील कथित दबावामागे कोण आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.