धाराशिव – तालुक्यातील पाडोळी गावातील शालेय पोषण आहारात मृत बेडूक आढळून आल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना स्थानिक शाळेत घडली, जिथे विद्यार्थ्यांना दिले जाणाऱ्या थ्र प्री मिक्स आहार तूर डाळ खिचडीच्या पाकिटात हा मृत बेडूक आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच गावातील पुनम सौदागर यांनी तात्काळ महिला व बालविकास विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी खिचडीच्या पाकिटात मृत बेडूक असल्याची बाब स्वतः पाहिली आणि पंचनामा केला. अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
या घटनेमुळे गावकरी संतप्त झाले असून त्यांनी शालेय पोषण आहार पुरवणाऱ्या कंपनीविरुद्ध तीव्र निषेध व्यक्त केला आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शालेय पोषण आहारात अशा प्रकारच्या त्रुटी वारंवार आढळून येत आहेत. यापूर्वीही पोषण आहारात नाग, किडे, मुंग्या आढळून आल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पोषण आहार बनवणाऱ्या कंपनीच्या कार्यपद्धतीवर आणि स्वच्छतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
गावकऱ्यांनी दोषी कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून पोषण आहार पुरवठ्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करण्याची मागणीही गावकऱ्यांनी केली आहे.
ही घटना केवळ पाडोळी गावापुरती मर्यादित नसून संपूर्ण राज्यातील शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त करणारी आहे. शालेय पोषण आहार योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हा आहे. मात्र, अशा घटनांमुळे या योजनेच्या उद्देशालाच तडा जात आहे.
या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. दोषी कंपनीवर कठोर कारवाई करण्यासोबतच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे.