धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा म्हणजे मराठवाड्याचं ‘शिवकाशी’. इथे दिवाळी, निवडणुका, आणि जत्रांसाठी फटाके बनतात. पण यंदा इथे वेगळाच स्फोट झाला—नियोजनाचा नाही, तर अक्षरशः जीवघेण्या अनागोंदीचा!
२९ जानेवारीला ‘बाबा फायर वर्क्स’ कारखान्यात स्फोट झाला आणि ९ कामगार भाजले. दरवर्षी असंच होतं. काही मरतात, काही जखमी होतात. आणि मग सुरू होतो सरकारी पंचनाम्यांचा तमाशा. यावेळी तर कहरच झाला! सरकारी अहवालात म्हटलंय, “शेजारच्या गवताने आग लागली!” म्हणजे काय? गवत स्वतःहून धडधड पेटलं आणि फटाक्यांवर हल्ला करायला आलं?
हे काय खेळ आहे?
मुळात या कारखान्यांना परवानगी मिळते कशी? नियम धाब्यावर बसवून, मोठमोठ्या रकमा उकळून फटाका परवाने वाटले जातात. नियमांचे बंधन नाही, सुरक्षा नाही, आणि फाईलींवर सही करणाऱ्यांना विचारणारी यंत्रणा नाही. सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव यांनी यावर उघड आरोप केले—निवासी उपजिल्हाधिकारी पैसे घेऊन बिनधास्त परवानग्या वाटत होते! तक्रार २८ नोव्हेंबरला दाखल झाली, पण ३० नोव्हेंबरला जिल्हाधिकारी मसुरीची थंड हवा खाऊन परत आले आणि विषय ‘आग कशी लागली’ यावर फिरवला.
स्फोट कशाचा—फटाक्यांचा की लाचखोरीचा?
ही आग खरंच गवताने लागली की नोटांनी?
- पंचनाम्यात आगीचा स्त्रोत स्पष्ट नाही.
- जखमी कामगार तेव्हा काय करत होते, त्यांना धूर का दिसला नाही?
- सुतळी बॉम्ब उन्हात वाळवत होते, तिथे सुरक्षा यंत्रणा नव्हती का?
- कारखान्यांना दिलेल्या परवानग्यांची पडताळणी झाली का?
हे सगळे प्रश्न हवेत झेपावलेल्या रॉकेटसारखे आहेत—फटफटले आणि मावळले. पण यावर कुणीच भाष्य करायला तयार नाही.
जिल्हाधिकारी ‘वन’मध्ये?
स्फोटानंतर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी तपासणीचे आदेश दिले, पण पंचनाम्यात दोष कोणावर टाकला? वन विभागावर! म्हणजे, कारखाना मालक, अधिकाऱ्यांची तडजोड, भ्रष्ट परवाने या सगळ्यावर झाकण घालायचं आणि ‘गवत जळालं, म्हणून आग लागली’ असा रिपोर्ट द्यायचा? हा अहवाल म्हणजे जबाबदारी झटकण्याचा उत्कृष्ट नमुना आहे.
यंत्रणा ठप्प, चौकशी गप्प!
हे असेच सुरू राहणार का?
- सर्व परवानग्यांची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे.
- त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून अहवाल तयार व्हायला हवा.
- फटाका परवाने कसे वाटले गेले याचा तपास पोलिस विभागाने करावा.
तेरखेड्यात जळणारे फटाके नाहीत, इथे कामगारांची आयुष्यं धडाधड पेटत आहेत. प्रश्न एवढाच—यावेळी कुणी तरी ‘स्फोटक’ निर्णय घेणार का, की पुन्हा सगळं झाकून टाकलं जाणार?