मंडळी, नवीन वर्षाची सुरुवातच धाराशिवमध्ये फटाक्यांनी झाली आहे. नाही, नाही… १४ जानेवारीला संक्रांत संपली असली तरी राजकीय आकाशात पतंग कापाकापीचा खरा खेळ आता सुरू झालाय. निमित्त आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे! ५५ जिल्हा परिषदेच्या जागा आणि ११० पंचायत समितीच्या जागा… पण खरी गंमत तर पुढेच आहे.
खुर्ची लेडीज, कारभारी कोण?
यंदा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलांसाठी राखीव झाले आणि जिल्ह्यातील अनेक ‘कारभारी’ नेत्यांच्या मिशीवरचा ताव आपोआप उतरला. “आता घरी मॅडमना विनंती करण्याशिवाय पर्याय नाही,” अशी अवस्था अनेकांची झाली आहे. पण सर्वात मोठी लढत रंगणार आहे ती दोन ‘हाय-प्रोफाईल’ महिला नेत्यांमध्ये.
एकीकडे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील. बिचाऱ्यांनी २०२४ च्या लोकसभेत ‘घड्याळ’ हाती बांधले, पण मतदारांनी तब्बल सव्वातीन लाखांच्या फरकाने वेळेचा काटाच फिरवला. तो ‘करेक्ट कार्यक्रम’ त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. त्यामुळे आता घड्याळाची टिकटिक बंद करून त्या थेट ‘कमळ’ फुलवायला मैदानात उतरल्या आहेत.
पण थांबा! पिक्चर अभी बाकी है…
पवारांची ‘शेरनी’ विरूद्ध पाटलांच्या ‘अर्चनाताई ’
अर्चना पाटलांना वाटले असेल की रस्ता मोकळा आहे, पण तिकडून शरद पवारांनी आपली ‘शेरनी’ मैदानात सोडली आहे. राष्ट्रवादीच्या फायरब्रँड नेत्या सक्षणा सलगर यांनी दंड थोपटले आहेत. सक्षणाताई म्हणजे साध्यासुध्या नाहीत, त्या ‘तेर’च्या भूमिपुत्र आणि धनगर समाजाच्या नेत्या. त्यांची एन्ट्री झाल्याने भाजपच्या गोटात “आता कसं व्हायचं?” अशी कुजबूज सुरू झाली आहे. एकीकडे सत्तेचा अनुभव आणि दुसरीकडे आक्रमक बाणा… ही कुस्ती नुसती ‘काटे की टक्कर’ नाही, तर थेट ‘ब्लास्ट’ होणार आहे!
भाजपमध्ये ‘तू तू-मैं मैं’ आणि तीन तिकाडा!
नगरपालिका निवडणुकीत यश मिळाल्याने भाजपचा ‘कॉन्फिडन्स’ गगनाला भिडलाय. त्यांना वाटतंय, “आपणच राजे!” म्हणून त्यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिलाय. पण आतली बातमी वेगळीच आहे. भाजपमध्ये सध्या ‘इच्छुकांची’ जत्रा भरली आहे आणि गट पडलेत तीन!
एकीकडे राणा पाटील (जे बाहेरून आलेत), दुसरीकडे बसवराज पाटील (जेही बाहेरून आलेत) आणि तिसरीकडे मूळचे आणि बिचारे निष्ठावंत सुजितसिंह ठाकूर! सुजितसिंहांचे कार्यकर्ते म्हणतायत, “आम्ही सतरंजी उचलायची आणि मलाई उपऱ्यांनी खायची?” त्यामुळे तिकिटाच्या रांगेत कोणाचे ‘कार्ड’ फाटणार आणि कोणाचे ‘जुळणार’, हे पाहताना प्रदेश कार्यालयाची डोकेदुखी वाढणार हे नक्की.
मविआ: “दुधाने तोंड पोळले, आता ताकही फुंकून पिणार”
नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीने ‘बिघाडी’ केली आणि भाजपला आयते यश मिळाले. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना वाटले, “अपुन ही भगवान है”, पण मतदारांनी त्यांना जमिनीवर आणले. आता मात्र त्यांना शहाणपण सुचले असावे. जर ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली, तर भाजपला ‘बॅकफूट’वर जाऊन बचावात्मक पवित्र्यात खेळावे लागेल. नाहीतर पुन्हा “आम्ही पडलो, पण आमची चर्चा जास्त” असे म्हणण्याची वेळ येईल.
तानाजीरावांची ‘वेगळी चूल’
इकडे भूम-परंड्यात आपले माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत (शिंदे गट) पुन्हा एकदा स्वतःची ‘वेगळी चूल’ मांडण्याच्या तयारीत आहेत. नगरपालिका निवडणुकीप्रमाणेच ते इथेही “महायुती गेली उडत, मी माझा राजा” याच भूमिकेत दिसतायत. त्यामुळे महायुती नावालाच उरली आहे, आतून मात्र ‘तुझं माझं जमेना, आणि तुझ्यावाचून करमेना’ अशीच अवस्था आहे. अजितदादांची राष्ट्रवादी तर या सगळ्या राड्यात ‘नाममात्र’ उरली आहे, जणू लग्नातली ‘वऱ्हाडी’ मंडळी!
निकाल ७ फेब्रुवारीला, पण धुरळा आताच!
१६ जानेवारीपासून अर्जाची धामधूम सुरु झाली आहे. ५ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीला निकाल. तोपर्यंत धाराशिवच्या गल्लीबोळात चहाच्या टपरीवर एकच चर्चा रंगणार…
“भाऊ, कमळ फुलणार की तुतारी वाजणार? का मशाल पेटणार?”
काहीही होवो, मतदारांसाठी मात्र हे इलेक्शन म्हणजे ‘फुल्ल टाईमपास’ आणि ‘फुकटची करमणूक’ असणार आहे, हे मात्र नक्की!
एकच सल्ला: इच्छुकांनी अर्ज भरताना जपून भरा, कारण बायकोला निवडून आणताना स्वतःचं ‘बीपी’ वाढवून घेऊ नका!
(लेखक: बोरूबहाद्दर )




