उमरगा – उमरगा तालुक्यातील येणेगुर येथील कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयातील 29 विद्यार्थ्यांना गढूळ पाणी प्याल्याने विषबाधा झाली आहे. विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब व अस्वस्थतेचा त्रास जाणवताच शाळा प्रशासनाने तातडीने वैद्यकीय मदत घेतली. विद्यार्थाना शुक्रवारी दुपारी एक वाजल्यापासून हा त्रास सुरु झाल्याचे सांगण्यात आले.
यापैकी चार विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर उर्वरित विद्यार्थ्यांवर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाने शाळेतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, गढूळ पाण्यामुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शाळेतील पाणीपुरवठा व्यवस्था तपासून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
Video