तुळजापूर: तुळजापूर शहरात मंगळवारी सायंकाळी काँग्रेसचे उमेदवार अमर मगर यांचे चुलत बंधू कुलदीप मगर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ला प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत ७ आरोपींना अटक करण्यात आली असून, गोळीबार करणारा मुख्य संशयित आरोपी अद्याप फरार आहे. फरार असलेला हा आरोपी भाजप उमेदवार आणि ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद ऊर्फ पिटू गंगणे याचा भाचा असल्याची माहिती समोर येत आहे.
नेमकी घटना काय?
१६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी कुलदीप मगर हे आपल्या शेतातून घराकडे परतत असताना विठाई हॉस्पिटलसमोर दबा धरून बसलेल्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला होता. “तू पिटू गंगणेच्या विरोधात प्रचार का केला?” असे म्हणत आरोपींनी मगर यांच्यावर पिस्तूलमधून गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले होते. या भीषण हल्ल्यात कुलदीप मगर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
पोलीस कारवाई आणि अटक:
या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९ (जीवे मारण्याचा प्रयत्न) आणि इतर कलमान्वये गुन्हा (FIR क्र. ०५०९/२०२५) दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आतापर्यंत ७ जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, प्रत्यक्ष गोळीबार करणारा आणि घटनेतील मुख्य सूत्रधार मानला जाणारा आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो पिटू गंगणे याचा जवळचा नातेवाईक (भाचा) असल्याने या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले आहे.
हल्ला अन् थरार:
हल्ल्याच्या वेळी आरोपींनी कुलदीप मगर यांच्या गळ्यातील सोन्याची साखळीही हिसकावून घेतली होती. जखमी अवस्थेतही मगर यांनी दोन आरोपींना (शुभम साठे आणि सागर गंगणे) पकडून ठेवले होते, ज्यांना घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता आणखी ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अन्नासाहेब मांजरे करत असून फरार आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे तुळजापुरात भीतीचे वातावरण असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.






