तुळजापूर: कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले तुळजापूर येथील नवीन बसस्थानक पहिल्याच पावसात गळू लागल्याने, त्यावर साधे पत्रे मारून डागडुजी केली जात आहे, या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, “पत्रेच ठोकायचे होते, तर जुने बसस्थानक काय वाईट होते?” असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
सुरुवातीपासूनच येथील नवीन बसस्थानकाचे बांधकाम वादग्रस्त ठरले आहे. बांधकामाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि आंदोलनेही झाली; मात्र याकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने बांधकाम पूर्ण केले. परिणामी, पहिल्याच पावसात बसस्थानकात पाणी साचले आणि बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या गळतीवर उपाय म्हणून बसस्थानकाच्या मागील बाजूस पत्रे मारण्यात आले आहेत, तसेच समोरील बाजूसही पत्रे लावण्याचा प्रस्ताव आहे. या डागडुजीमुळे कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे.
८ कोटींच्या बसस्थानकाची क्षमता केवळ ४ बसची
जवळपास आठ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या नवीन बसस्थानकात केवळ चार बस दाटीवाटीने थांबू शकतात. पाचवी बस आल्यास ती महामार्गावर उभी राहते, ज्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. इतकेच नव्हे, तर शिवशाही आणि हिरकणी यांसारख्या आरामदायी बस येथे वारंवार फसण्याचे प्रकार घडत असल्याने बसस्थानकाच्या डिझाइनवरच शंका व्यक्त केली जात आहे.
अडीच महिन्यांनंतरही सुविधांचा अभाव
राज्याचे परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते बसस्थानकाचे उद्घाटन होऊन अडीच महिने उलटले असले, तरी येथे सुविधांचा मोठा अभाव आहे. बसस्थानकात अपुरी विद्युत व्यवस्था आहे, पिण्याच्या पाण्याची सोय नाही आणि पाण्याअभावी स्वच्छतागृहांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यासोबतच, सीसीटीव्ही आणि स्वयंचलित उद्घोषणा प्रणाली यांसारख्या महत्त्वाच्या सुविधाही उपलब्ध नाहीत.
कोंडी रोखण्यासाठी नवीन प्रवेशद्वाराची योजना
बसस्थानकातील कोंडी कमी करण्यासाठी धाराशिवकडे जाणाऱ्या मार्गावर आणखी एक गेट तयार करण्यात येणार असल्याचे आगारप्रमुख रामचंद्र शिंदे यांनी सांगितले त्यांच्या मते, सीसीटीव्हीला मंजुरी मिळाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे. तसेच, पाठीमागे पत्रे मारल्यामुळे बसस्थानकात पाणी येणे थांबले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.