धाराशिव – जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२४-२५ अंतर्गत मंजूर झालेल्या अनेक कामांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून, केवळ ज्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत, ती कामे या स्थगितीच्या बाहेर ठेवण्यात आली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी याबाबत अधिकृत आदेश जारी केला आहे.
धाराशिवचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिनांक २६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर “जिल्हाधिकारी धाराशिव ‘अ’ प्रमाणे कार्यवाही करावी” अशा सूचनांसह आदेश दिला होता.
नियोजन विभागाचे उपसचिव नि.भा. खेडकर यांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव यांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यान्वयन यंत्रणांना आदेश काढून, स्थगितीचा स्पष्ट उल्लेख केला आहे.
या आदेशानुसार –
– ज्यांना प्रशासनाकडून कार्यारंभ आदेश मिळाले आहेत, ती कामे सुरु राहतील.
– अन्य सर्व कामांना, ज्या केवळ प्रशासकीय मान्यता प्राप्त आहेत, त्यांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
– तसेच, ज्या प्रस्तावित कामांना अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही, त्यांनाही पुढील आदेश होईपर्यंत मान्यता देऊ नये.
या निर्णयामुळे जिल्हा नियोजन योजनेतील अनेक प्रस्तावित आणि मंजूर कामांची अंमलबजावणी काही काळासाठी रखडणार आहे. यामागील कारणे स्पष्ट करण्यात आलेली नसली, तरी ही कारवाई वरिष्ठ पातळीवरील चर्चेच्या अनुषंगाने घेतल्याचे स्पष्ट होते.