कळंब – मौजे डिकसळ (ता. कळंब) येथे अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या ‘स्वप्ननगरी’ वसाहतीमुळे स्थानिक नैसर्गिक ओढ्याचा प्रवाह अडवल्याचे उघडकीस आले असून, यामुळे परिसरात संभाव्य पूरस्थिती आणि जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणात संबंधित वसाहतीच्या मालकावर अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी किरण कीर्ती पुजार यांची भेट घेऊन, उपविभागीय अधिकारी कळंब, तहसीलदार व मंडळ अधिकारी यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.
डिकसळ ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वप्ननगरी वसाहतीचे मालक यांनी कळंब–ढोकी रस्त्यावरील पुलालगत असणाऱ्या नैसर्गिक ओढ्यावर अतिक्रमण करत ओढ्याचा प्रवाह रोखून तेथे रस्ता तयार केला. यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबून पुलाला धोका निर्माण होण्याची तसेच परिसरातील कृष्णा हॉस्पिटल, घरे व दुकाने पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात ग्रामस्थांनी ३ फेब्रुवारी २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी कळंब यांना भेटून निवेदन सादर केले होते. मात्र दोन महिने उलटूनही कोणतीही कारवाई झाली नाही. उलट, प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दोषी बांधकामधारकांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असून, प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली आहे.
या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य इम्रान मुल्ला, मोबीन मणियार, आनंत बोराडे, रफिक सय्यद यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विकास कदम, युवराज पिंगळे, अखिल काजी, दीपक गवळी, जिव्हेश्वर कुचेकर, गणेश त्रिवेदी, अभय गायकवाड, अलीम दारूवाले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.