धाराशिव – रमजान ईद म्हटलं की भाईचाऱ्याचा सुगंध, नमाजाची शांति… पण यंदाच्या ईदगाह मैदानात काहीसा “ड्रोनखटाळ” झाला! आकाशात नमाजच्या वेळी तीन ड्रोन उडताना दिसले, आणि काही राजकीय मंडळींचं रक्तच सळसळलं – कारण त्यांना रीलसाठी फुटेजच मिळालं नाही!
एक ड्रोन पोलीस विभागाचा होता, आणि उरलेले दोन खासगी. पण नेमकं हे खासगी ड्रोन कोणाच्या “आशीर्वादाने” उडाले, यावरूनच सारा गोंधळ सुरू झाला. विरोधी आमदारांनी पोलीस अधीक्षकांकडे थेट तक्रार ठोकली – “हे कोणाचे ड्रोन? आम्हाला रील नाही, फुटेज नाही… मग हे आकाशात उडतंय तरी कुणासाठी?”
पोलीसांनी आपली “उडती चौकशी” सुरू केली. ड्रोनधारकांना फोन लागताच उलगडा झाला – हे खासगी ड्रोन एका सत्ताधारी आमदाराच्या “सोशल मीडिया प्रभारी” यांच्या सांगण्यावरून लावले होते… उद्देश – ईदचा ‘इन्फ्लुएंसर टच’ असलेली रील तयार करून वायरल करणे!
यावर विरोधी आमदारांनी पुन्हा आक्रमक अवतार घेतला – “हे बघा, ईदच्या नमाजातही सत्ताधाऱ्यांना आपली रील हवी! जनतेपेक्षा ज्यादा फोकस कॅमेऱ्यावर!”
सत्ताधारी कार्यकर्तेही गप्प बसणाऱ्यातले नव्हते. त्यांनी काही युट्यूब पत्रकारांना पकडून बाईट दिली – “विरोधकांचं कामच असतं तक्रारी करायचं. तेच नमाजातही करतायत. ड्रोन आकाशात, आणि विरोधकांचं राजकारण जमिनीवर!”
सध्या या ड्रोन-ड्रामा वरून सोशल मीडियावर #EidWithDrone आणि #FootageWar ट्रेंड करतायत.
धाराशिवकर मात्र म्हणतायत – ईद आली, नमाज झाली, पण या राजकीय रीलची मस्करी मात्र अजून सुरूच आहे!
(अधिक अपडेटसाठी ड्रोनकडे पाहा… किंवा ट्विटरवर स्क्रोल करा!)