धाराशिव – जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या तब्बल २६८ कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती मिळाल्यामुळे धाराशिव शहरातील विकासाची घडी विस्कटली आहे. उद्याने, बाजार मैदान, अंतर्गत रस्ते, शाळा, रुग्णालयं, औषध खरेदी, पशुधन योजनांपासून ते वीज वितरणाच्या कामांपर्यंत सर्वच ठप्प होणार आहेत.
४ कोटींच्या बाजार मैदान विकासाला ब्रेक!
धाराशिव शहरातील बाजार मैदानाच्या विकासासाठी मंजूर झालेले ४ कोटींचे काम सत्तांतरानंतर थेट स्थगित करण्यात आले. यामुळे या प्रकल्पाची सुरुवातही न होता तो रखडलेला आहे.
जिजामाता, संभाजी, बाळासाहेब ठाकरे उद्यानेही अंधारात
शहरातील प्रमुख तीन उद्यानांसाठी –
-
जिजामाता उद्यान
-
छत्रपती संभाजी महाराज उद्यान
-
बाळासाहेब ठाकरे उद्यान
यांच्या विकासासाठी ७ कोटींचा निधी मंजूर झाला होता, मात्र त्यालाही स्थगिती मिळाल्यामुळे नागरिकांना हरित परिसराचे स्वप्न अपूर्ण राहणार आहे.
११८ अंतर्गत रस्ते – निविदा सुरू असतानाच स्थगिती!
नगरपालिकेने शहरातील ११८ रस्त्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती, पण त्यातच स्थगितीचा आदेश आला. नंतर ही कामे बीएन्डसी (B&C) विभागाकडे वळवण्यात आली. आता खर्च वाढल्यामुळे दर्जेदार कामाऐवजी निकृष्ट कामांचे सावट आहे.
या कामांवरही संकट!
स्थगित करण्यात आलेल्या २६८ कोटी निधीतून पुढील कामे होणार होती:
-
८२ शालेय वर्गखोल्या
-
२०० पेक्षा जास्त रस्त्यांची कामे
-
१०५ डीपी (वीज वितरण केंद्रे) शेतांमध्ये
-
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय
-
औषध खरेदी, आरोग्य साहित्य, पशुधन संवर्धनाच्या योजना (१.५ कोटी)
-
नगरपालिका क्षेत्रातील रस्ते, पथदिवे, इमारतींची दुरुस्ती
स्थगितीचा फटका थेट नागरिकांवर!
या स्थगितीमुळे शहराच्या पायाभूत विकासावर ब्रेक लागलेला आहे. शहरी सुविधा, आरोग्य सेवा आणि शैक्षणिक सुविधा थांबवण्यात आल्या असून, याचा थेट फटका धाराशिवच्या सामान्य जनतेला बसणार आहे.