परंडा तालुक्यातील प्रतिभाताई पवार हायस्कूल, जवळा (नि.) येथे ‘शिक्षण’ या पवित्र शब्दाची खिल्ली उडवणारे नाटक सध्या रंगत आहे. याचा पहिला अंक आज सकाळीच मंचावर आला — अर्थात गटशिक्षणाधिकारी यांच्या “तपासणी दौऱ्या”च्या रूपात!
पहिला अंक: गटशिक्षणाधिकारींची फक्त ‘चक्कर’
उस्मानाबाद ( धाराशिव ) जिल्हा मागासवर्गीय शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या तक्रारीवरून गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेला दिलेली भेट म्हणजे फक्त ‘दर्शनी दौरा’! शाळेत पोहोचताच त्यांनी कोणतीही तपासणी न करता मुख्याध्यापकाला विचारलं, “तुम्हीच तक्रार दिली का संघटनेकडे?”
हे विचारून अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी इथंच संपवली आणि परत आपल्या ऑफिसात जाऊन शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी पाठवलेले तपासणीचे पत्र मुख्याध्यापकाच्या व्हॉट्सअॅपवर टाकून मोकळे झाले. पहिल्या अंकात एवढंच घडलं — म्हणजे नाटक सुरूच आहे!
दुसरा अंक: ‘तपासणी’चा खरा खेळ
शिक्षणाधिकारीच्या आदेशाचा अभिनय साकारण्यासाठी आज पुन्हा एकदा गटशिक्षणाधिकारी शाळेत हजर झाले. यावेळी त्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन प्रत्यक्ष विद्यार्थी संख्या मोजली — आणि धक्कादायक सत्य समोर आलं. जवळपास प्रत्येक वर्गात शून्य विद्यार्थी!
यानंतर या नाटकात ‘सुपरव्हिलन’सारखी एन्ट्री झाली संस्थाचालक राहुल कारकर यांची. त्यांनीच खळखळून कबुली दिली की, “या शाळेत काहीच नाही, पण आठ शिक्षक बसून पगार खात आहेत.”
हे सांगताना ते विसरले की, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना २५ लाख रुपये देऊन स्वतःच्या पत्नीचे पद या भकास शाळेत बसवण्यासाठी तेच धडपड करत आहेत. म्हणजे शाळा नसताना पद आहे, विद्यार्थी नसताना पगार आहे — आणि वरून राजकीय आणि प्रशासकीय वरदहस्त!
तिसरा अंक: ‘नाटकाचा शेवट की सुरुवात?’
या संपूर्ण प्रकारात गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी आणि संस्थाचालक एकाच रंगमंचावर आपापले रोल वठवत आहेत. चौकशी फक्त कागदावर, जबाबदारी शून्य, आणि सिस्टीमला फक्त “पगार वसूल” करण्याची काळजी!
हे सगळं नाटक आता उघड पडलं आहे — पण नेहमीप्रमाणे कारवाई मात्र ‘शून्य’. पत्रं लिहून, व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड करून आणि गप्पा मारून शिक्षण खातं पवित्र राहत नाही, हे कोणीतरी या अधिकाऱ्यांना सांगायला हवं.
बोरूबहाद्दर म्हणतो,
“विद्यार्थी नसले तरी शाळा आहे, शिक्षक आहेत, पगार आहे, पण शिक्षण? — फक्त नावापुरतं. आता हे नाटक बंद व्हायला हवं!“