उमरगा- उमरग्यातील वन विभागाचे कार्यालय अक्षरशः रामभरोसे असल्याचे चित्र उभे राहत आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील या विभागात अधिकारी आणि कर्मचारी हे सतत गैरहजर असतात. विचारणा केली असता “साईटवर गेले आहेत” असे उत्तर देण्यात येते, मात्र प्रत्यक्षात नागरिक व शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकण्यास कोणीच उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते आहे.
“साईटवर” की खाजगी कामात व्यस्त?
या कार्यालयाचे प्रमुख अधिकारी कराड हे सतत लातूरमध्येच असतात. उमरग्यात केवळ मनात येईल तेव्हाच ते उपस्थित राहतात. हीच परिस्थिती अन्य कर्मचाऱ्यांची असून, त्यांचेही कार्यालयात नियमित हजेरीवर प्रश्नचिन्ह आहे. “साईटवर गेलो आहोत” असे सांगून अनेक अधिकारी आणि कर्मचारी खाजगी कामात व्यस्त असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
प्रत्यक्ष पाहणी – खुर्च्या रिकाम्या, फॅन सुरू
आमच्या प्रतिनिधीने वनविभागाच्या उमरगा कार्यालयाला भेट दिली असता, संपूर्ण कार्यालयात एकही अधिकारी किंवा कर्मचारी आढळला नाही. सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या, मात्र सर्व पंखे सुरू होते. विद्युत बिल सरकारच्या तिजोरीतून भरले जाते, त्यामुळे माझ्या बापाचे काय जाते, अशी भावना यांची आहे.
वन्यप्राण्यांची हालचाल, पण विभागाची हलगर्जी
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांत परिसरात बिबट्या, तरस व वाघाच्या हालचालींच्या चर्चा समाजमाध्यमांवर सुरू आहेत. चार दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाजवळील डाळिंब गावानजीक एका व्यक्तीने संध्याकाळी आठच्या सुमारास वाघ अथवा बिबट्या प्रजातीचा प्राणी पाहिल्याचे समाजमाध्यमांवर निदर्शनास आणून दिले. मात्र वनविभागाने यावर काय कारवाई केली, हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
नागरिक आणि शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर
वन विभागाचे काम अत्यंत महत्त्वाचे असून नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे तत्परतेने लक्ष देणे अपेक्षित असते. मात्र उमरग्यातील वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे संभाव्य धोके वाढत चालले आहेत. आता तरी प्रशासनाने या स्थितीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
Video