धाराशिव – शहरातील सांजा चौकात एका ३१ वर्षीय तरुणाला विनाकारण जातीवाचक शिवीगाळ करत रॉड, कत्ती आणि फायटरने गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामेश्वर दिलीप कांबळे (वय ३१ वर्षे, रा. सांजा ता. जि. धाराशिव) हे ३१ मार्च २०२५ रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजता सांजा चौकातील काका मोरे यांच्या पानटपरीवर होते. यावेळी आरोपी योगेश शाहू सूर्यवंशी, देविदास शाहू सूर्यवंशी आणि दया सुधाकर सूर्यवंशी (सर्व रा. सांजा ता. जि. धाराशिव) यांनी तेथे येऊन फिर्यादी रामेश्वर कांबळे यांना काहीही कारण नसताना जातीवाचक शिवीगाळ केली.
त्यानंतर आरोपींनी संगनमत करून रामेश्वर कांबळे यांना लाथाबुक्यांनी, तसेच कत्ती, रॉड आणि फायटरसारख्या धोकादायक शस्त्रांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली.
या घटनेनंतर पीडित रामेश्वर कांबळे यांनी ४ एप्रिल २०२५ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी योगेश सूर्यवंशी, देविदास सूर्यवंशी आणि दया सूर्यवंशी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(१), ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (ॲट्रॉसिटी ॲक्ट) कलम ३(१)(आर) व ३(१)(एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. धाराशिव शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.