अणदूर – सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अणदूर येथील उड्डाणपुलाचे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार प्रवीण स्वामी यांना महिनाभरापूर्वी दिले होते. मात्र, उड्डाणपुलाचे काम अजूनही रखडलेल्या अवस्थेतच आहे. खासदारांना दिलेले हे आश्वासन पूर्णपणे हवेत विरले असून, प्रशासकीय यंत्रणेचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
महिनाभरापूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर आणि उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी सोलापूर-उमरगा या रखडलेल्या महामार्गाची पाहणी करून अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत रस्त्याच्या दुर्दशेवर आणि विशेषतः अणदूर उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी १५ एप्रिल २०२५ पर्यंत हे काम पूर्ण केले जाईल, असे ठाम आश्वासन दिले होते.
प्रत्यक्षात मात्र, डेडलाईन जवळ येऊन ठेपली तरी अणदूर उड्डाणपुलाच्या कामात कोणतीही लक्षणीय प्रगती झालेली नाही. काम अजूनही अपूर्णच असल्याने परिसरातील नागरिकांचे, विशेषतः जवाहर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे हाल सुरूच आहेत. विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून धोकादायक रस्ता ओलांडावा लागत आहे. तसेच, बस प्रवाशांनाही विरुद्ध दिशेला उतरून जीव धोक्यात घालून रस्ता पार करावा लागतोय.
तसेच नळदुर्ग बायपासचा एकेरी मार्ग नावापुरता सुरू असला तरी, दुसरा मार्ग कधी पूर्ण होणार याचे उत्तर कोणाकडे नाही. या अर्धवट आणि धोकादायक रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच आहे. नळदुर्गचा एकेरी बायपास अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे अत्यंत धोकादायक बनला आहे. या मार्गावर ओव्हरटेक करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. नळदुर्गहून श्री खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या वळणावरही अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
खासदारांसारख्या लोकप्रतिनिधींना दिलेल्या आश्वासनाला जर अधिकारी केराची टोपली दाखवत असतील, तर सामान्य नागरिकांच्या समस्यांकडे किती गांभीर्याने पाहिले जात असेल, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अणदूर उड्डाणपुलाचे आणि नळदुर्ग बायपासचे काम कधी पूर्ण होणार आणि नागरिकांची या त्रासातून सुटका कधी होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृती करून हे काम तात्काळ पूर्ण करावे, अशी संतप्त मागणी जोर धरू लागली आहे.