तुळजापूरच्या धार्मिक आणि शांत प्रतिमेला तडा देणारं ड्रग्ज प्रकरण सध्या केवळ तपासाच्या दिरंगाईमुळेच नव्हे, तर राजकीय चिखलफेक आणि माध्यमांतील उलटसुलट चर्चांमुळे जास्त गाजतंय. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी तामलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला खरा, पण महिना उलटून गेला तरी तपासाची गाडी इंचभरही पुढे सरकलेली दिसत नाही. ३५ जणांवर गुन्हा दाखल झाला, त्यातले १४ गजाआड गेले, पण उरलेले २१ जण अजूनही पोलिसांच्या हाताला लागलेले नाहीत. हे प्रकरण म्हणजे आता पोलिसांची निष्क्रियता, राजकारण्यांचा स्वार्थ आणि माध्यमांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक गंभीर गदारोळ बनला आहे.
पोलिसांची अजब तऱ्हा:
गेल्या महिनाभरात एकही फरार आरोपी पकडला जात नाही, हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह आहे. आरोपी मोकाट फिरत असताना, पोलिसांनी शहरातल्या ८० लोकांना चौकशीसाठी नोटीसा पाठवल्या. यातून काय साधलं, हे केवळ पोलीसच जाणोत! दुसरीकडे, फरार २१ पैकी ६ महाभागांनी थेट जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. आता न्यायालय त्यांना दिलासा देणार की कायद्याचा बडगा दाखवणार, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. पोलिसांचा तपास नक्की कोणत्या दिशेने चालला आहे, हाच खरा प्रश्न आहे. फरार आरोपींना पकडण्याऐवजी इतरांना नोटीसा पाठवून पोलीस काय सिद्ध करू पाहत आहेत?
राजकारणाचा धुरळा:
तपासाची गाडी रुळावर यायची सोडून, राजकीय आखाड्यात मात्र आरोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधताच, आमदार स्वतः मैदानात न उतरता त्यांचे कट्टर समर्थक विजय गंगणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ओमराजेंवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. ओमराजेंच्या वडिलांचा (पवनराजेंचा) एकेरी उल्लेख करत, ते दूध विकत होते अशी हेटाळणी करण्यात आली. यावर ओमराजे समर्थकही सोशल मीडियावर सक्रिय झाले आणि गंगणेंना धारेवर धरले. याच गंगणेंनी एका स्थानिक पत्रकारावर खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोपही केला. दुसरीकडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांनीही आमदार राणा पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा मागितला आहे. या सगळ्या राजकीय तू-तू मैं-मैं मध्ये ड्रग्जचा मूळ मुद्दा आणि आरोपी कुठेतरी हरवून गेले आहेत.
माध्यमं आणि पुजारी:
या प्रकरणात माध्यमांनीही तेल ओतण्याचे काम केले. काही माध्यमांनी थेट १३ पुजारी यात सामील असल्याचा ‘जावईशोध’ लावला. यामुळे पुजारी मंडळी प्रचंड संतापली असून, आपली बदनामी खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, पुजाऱ्यांनीही त्याच धाराशिवच्या पत्रकारावर खोट्या बातम्या दिल्याचा आरोप केला, ज्याच्यावर विजय गंगणेंनी आरोप केला होता. त्यामुळे हा योगायोग आहे की आणखी काही, हाही एक प्रश्नच आहे.
चुकतोय कोण?
ड्रग्जसारख्या गंभीर प्रकरणात तपास यंत्रणा ढिम्म, राजकारणी एकमेकांचे कपडे फाडण्यात व्यस्त आणि माध्यमांकडून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न. या सगळ्यात नेमकं चुकतंय कोण? पोलीस त्यांच्या दिरंगाईने आणि गोंधळलेल्या कार्यपद्धतीने? राजकारणी मूळ विषयाला बगल देऊन व्यक्तिगत चिखलफेक करण्यात? की माध्यमे खात्री नसलेल्या बातम्या देऊन वातावरण तापवण्यात?
खरं तर, या प्रकरणात सगळ्यांचीच भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. जोपर्यंत पोलीस फरार आरोपींना अटक करत नाहीत, राजकारणी जबाबदारीने वागत नाहीत आणि माध्यमे खात्रीशीर माहिती देत नाहीत, तोपर्यंत तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा तपास हा असाच धुराळ्यात हरवलेला आणि राजकारणाच्या शिमग्यात जळत राहणार आहे. यात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे आणि मूळ गुन्हेगार मोकाट सुटण्याचा धोका वाढत आहे.
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह