येरमाळा : येरमाळा पोलिसांनी शनिवारी, १२ एप्रिल २०२५ रोजी, गुन्हा करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे कोयता बाळगणाऱ्या बीड जिल्ह्यातील दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लोखंडी मुठीचा कोयता जप्त करण्यात आला असून, त्यांच्यावर शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी वैभव संभाजी कसबे (वय २०) आणि उत्तरेश्वर महादेव कांबळे (वय २१, दोघे रा. झोपडपट्टी, युसूफ वडगाव, ता. केज, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
येरमाळा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी येरमाळा शहरातील इमरान मेडिकल समोरच्या रस्त्यावर दोन तरुण संशयास्पदरीत्या फिरत होते. पोलिसांच्या पथकाने त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे एक लोखंडी मूठ असलेला ३.८५ सेमी लांबीचा कोयता आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालमत्ता किंवा व्यक्तीविरोधात गुन्हा करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा कोयता बेकायदेशीरपणे जवळ बाळगला होता.
पोलिसांनी तात्काळ हा कोयता जप्त केला आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात वैभव कसबे आणि उत्तरेश्वर कांबळे यांच्या विरोधात भारतीय शस्त्र कायदा कलम ४ आणि २५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.