उमरगा: शहरातील एका बांधकाम गुत्तेदारावर आज, मंगळवारी (ता. १५) दुपारी राष्ट्रीय महामार्गावर फिल्मी स्टाईलने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कारमधून आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी दुचाकीस्वार गुत्तेदाराला अडवून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गुत्तेदार गंभीर जखमी झाला असून, त्याला सोलापूर येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उमरगा येथील रहिवासी असलेले बांधकाम गुत्तेदार गोविंद राम दंडगुले (वय ४२) हे मंगळवारी दुपारी सुमारे चार वाजता बँक कॉलनीतून आपल्या दुचाकीवरून राष्ट्रीय महामार्गाने घराकडे जात होते. आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आणि मारुती सुझुकी शोरूमजवळ पोहोचले असता, एका कारमधून आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी त्यांची दुचाकी अडवली. काही कळण्याच्या आतच हल्लेखोरांनी दंडगुले यांच्या डोक्यावर आणि उजव्या हातावर धारदार शस्त्राने सपासप वार केले आणि तेथून कारमधून पळ काढला.
रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या दंडगुले यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने एका ऑटो रिक्षातून उमरगा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आमदार प्रवीण स्वामी यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली व चर्चा केली. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला आणि हल्लेखोर कोण होते, याचा तपास उमरगा पोलीस करत आहेत. भरदिवसा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या हल्ल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.