धाराशिव: मंडळी, कान देऊन ऐका! आपलं धाराशिव नगर पालिका म्हणजे काय साधीसुधी जागा राहिली नाहीये. अहो, हे तर झालंय भ्रष्टाचाराचं एक ‘ऑल यू कॅन ईट’ रेस्टॉरंट! रस्ते तर सोडाच, आता ‘बोगस गुंठेवारी’ नावाचा नवा ‘स्टार्टर’ पण मेन्यू कार्डवर आलाय!
या रेस्टॉरंटचे एक ‘कर्तबगार’ शेफ, नगर रचना सहाय्यक मनोज कलुरे साहेब, यांची तब्बल दीड वर्षांपूर्वीच अहमदनगरला बदली झाली होती. पण आमच्या मुख्याधिकारी मॅडमची माया काही कमी होईना! का? अहो, आतली बातमी अशी आहे की, कलुरे साहेब गुंठेवारीच्या ‘स्पेशल डिश’मध्ये जो ‘मलिदा’ तयार करायचे, त्यातला मानाचा वाटा मॅडमपर्यंत पोहोचायचा म्हणे! त्यामुळे मॅडमने साहेबांना ‘रिलीव्ह’ करण्याऐवजी ‘रिझर्व्ह’ करून ठेवलं होतं. पण शेवटी कंटाळलेल्या नगर रचना विभागानेच पुढाकार घेतला आणि कलुरे साहेबांना एकतर्फी ‘गेट आऊट’चा आदेश देत अहमदनगरला पार्सल केलं. चला, देर आये दुरुस्त आये!
पण गंमत इथेच संपत नाही! मुंबईहून एक आरोग्य निरीक्षक खास धाराशिवकरांच्या आरोग्याची काळजी घ्यायला आलेत. सहा महिने झाले बिचारे हेलपाटे मारतायत, पण त्यांना अजून खुर्चीचा पत्ता नाही! मग शहराचं आरोग्य कोण सांभाळतंय? अहो, आपले हरहुन्नरी विद्युत अभियंता! म्हणजे आता शहरात कुठे लाईट गेली काय किंवा कोणाला ताप आला काय, सगळं आपले इंजिनियर साहेबच बघणार! व्वा! या ‘इलेक्ट्रिकल हेल्थकेअर’मध्ये पण ‘मलिद्याचा’ करंट जोरदार पास होतोय, असं दबक्या आवाजात बोललं जातंय.
एकंदरीत काय, तर धाराशिव पालिकेत सध्या ‘अजब तुझं सरकार’चा खेळ सुरू आहे. बदली झालेले जात नाहीत, आलेले लागत नाहीत आणि भलतेच लोक भलती कामं करून ‘मलिदा’ खाण्यात व्यस्त आहेत. नागरिकांनी आता आपल्या समस्यांसाठी नक्की कोणाकडे जायचं? कदाचित पुढच्या वेळी आपल्याला फायर ब्रिगेडवाला पाणीपुरवठ्याचा हिशोब देताना दिसेल! जय हो!