धाराशिवातलं हवामान सध्या तापलेलं आहे. पण उन्हामुळे नाही… पिटू भावाच्या “पिटाळू” शब्दांमुळे! ड्रग्ज प्रकरणाने आधीच तुळजापूरचा परिसर “उडता पंजाब” ची रील” वाटायला लागला होता, त्यात पत्रकार परिषदेत दिलेल्या धमक्यांनी “धमकी परिषद” म्हणूनच इतिहासात नोंद व्हावी अशी अवस्था झाली.
प्रसंगः
तीन दिवसापूर्वी शनिवारी तुळजापूरच्या एका AC नसलेल्या हॉलमध्ये विजय गंगणे यांनी पत्रकार परिषद बोलावली. खरंतर विषय होता ड्रग्ज प्रकरणातले गैरसमज दूर करणं, पण स्टेजवर गंगणे आणि इंद्रजीत साळुंके बसले आणि वातावरणात वाफा ऐवजी वादळं पेटली.
“पत्रकार लोकांनी आमच्या बदनामीची भाजी बनवली आहे,” असं म्हणत विजय गंगणे यांनी सुरुवात केली आणि त्यांच्यासोबत बसलेले इंद्रजीतभाऊ स्टेजवरच फॉर्ममध्ये आले!
“जर बातम्या केल्या तर नागवे करू,” असा शब्दजाळाचा बॉम्ब टाकताच – हॉलमध्ये एकाच क्षणी AC लागल्यासारखी थंडी पसरली.
जणू काही ते पत्रकार परिषद नसून “गुन्हेगारी टेड टॉक” सुरू झाला होता!
आजचा नजारा:
याविरुद्ध आज धाराशिवातले पत्रकार एकत्र जमले. पत्रकारांचं एक शिष्टमंडळ तयार झालं. ते पाहून पोलीस अधीक्षकांनाही वाटलं कुठे तरी मोर्चा चालून आला की काय!
“पत्रकारांना नागवे करण्याची धमकी म्हणजे काय समजतोय का विजू गंगणे? तो काय ‘फॅशन शो’ लावतोय का?”, असं म्हणत पत्रकारांनी पायात ब्रॉडकास्टिंगचा आत्मा, आणि डोक्यात लोकशाहीचा हेल्मेट घालून निवेदन झळकावलं.
काही पत्रकारांनी डायलॉगही टाकले:
- “आम्ही बातम्या करतो, बांगड्या नाही घालत!”
- “ड्रग्जची बातमी केली म्हणून जर नागवे करायचं असेल, तर मग पुढचं वार्तांकन ‘ब्लर’ मध्येच करावं लागेल!”
कथा ऐकून धाराशिवकरही गोंधळात:
काही लोकांना वाटलं की “नागवे” म्हणजे व्हिडीओ व्हायरल होणार !
तर काहींना वाटलं की “पिटू” गंगणे यांचं खरं नाव पिटाई गंगणे असावं!
शेवटचा पंच:
पत्रकारांनी म्हटलंय की, जर यावर कायदेशीर कारवाई झाली नाही, तर आम्ही पुढे “पत्रकार परिषदेत फक्त चड्डी-बनियान घालून जाऊ” असा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा देऊ.
कारण कपडे गेले तरी चालतील… पण पत्रकारितेचा स्वाभिमान नाही गमवायचा!
📢 Moral of the Story:
बातम्या दबवण्याचा प्रयत्न केला तर, बेपर्दा सत्यच उघडं पाडतं…
आणि पत्रकारांच्या डोक्यात बातम्या असतात… बाकीचं सगळं ब्लर असतं!
- बोरूबहाद्दर