सोलापूर: सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या हॉस्पिटलमधील प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला अटकही करण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री डॉ. वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. घटनेनंतर समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये त्यांनी मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर, रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी मनीषा मुसळे-माने हिला अटक करण्यात आली. या घटनेमुळे सोलापूरच्या वैद्यकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
कर्मचाऱ्याकडून धमकी आणि तणावाची चर्चा:
डॉ. वळसंगकर हे रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार कागदोपत्री आणि पारदर्शक असावेत यासाठी आग्रही होते. मात्र, सूत्रांनुसार, काही कर्मचारी, विशेषतः मनीषा मुसळे-माने, रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारत होत्या. या प्रकाराला डॉ. वळसंगकर यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. या अनियमिततेमुळे त्यांनी संबंधित महिला कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकले होते. मात्र, त्यानंतर या महिला कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, अशी चर्चा आहे. या धमकीमुळे डॉ. वळसंगकर तणावाखाली होते आणि याच कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात त्यांना पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्लाही देण्यात आला होता, मात्र त्यांनी त्याला नकार दिला होता.
कोण होते डॉ. शिरीष वळसंगकर?
डॉ. शिरीष वळसंगकर (वय ६९) हे सोलापुरातील एक अत्यंत प्रतिष्ठित न्यूरोफिजिशियन होते. त्यांनी अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे ‘एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस’ रुग्णालय उभारले होते. सोलापूरमधील दयानंद कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेज, सोलापूर येथून एमबीबीएस आणि एमडीची पदवी संपादन केली होती.
त्यांनी लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून MRCP (UK) ही पदवीही मिळवली होती. देशभरातील नामांकित मेंदूविकार तज्ञांमध्ये त्यांची गणना होत असे. १९९९ मध्ये त्यांचे रुग्णालय रुग्णसेवेत आले. कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील रुग्णांसाठी त्यांचे एसपीएम न्यूरो हॉस्पिटल हे अत्याधुनिक उपकरणे आणि उपचारांसाठी ओळखले जात असे. विशेषतः न्यूरोलॉजी संबंधी निदान, उपचार, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि संशोधनासाठी त्यांचे रुग्णालय मानांकित होते.
मेंदू विकारासंदर्भातील शस्त्रक्रियेवरील त्यांचे शोधनिबंध देश-विदेशातील परिषदांमध्ये सादर झाले होते. त्यांनी कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल, कुर्डुवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे इंटर्नशीप केली होती, तर डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून पदव्युत्तर प्रशिक्षण पूर्ण केले होते. लंडनमधील मैदा वेल न्यूरोलॉजिकल हॉस्पिटलमध्येही त्यांनी काही काळ प्रशिक्षण घेतले. बॉम्बे हॉस्पिटलमधून त्यांनी आपल्या रुग्णसेवेची सुरुवात केली होती.
वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त डॉ. वळसंगकर हे अत्यंत हौशी व्यक्ती होते. त्यांना प्रवासाची खूप आवड होती आणि त्यासाठी त्यांनी स्वतःचे विमानही खरेदी केले होते. याच विमानातून ते देशातील विविध भागात प्रवास करत असत. तसेच, अनेक शिकाऊ वैमानिकांना त्यांनी मार्गदर्शनही केले होते.
आत्महत्येपूर्वीचा घटनाक्रम:
- शुक्रवारी (१८ एप्रिल) रात्री ८ वा.: डॉ. वळसंगकर एस.पी ऑफ न्युरो सायन्सेस येथे रुग्णांची तपासणी करून घरी परतले.
- रात्री ८:३० वा.: बेडरूमच्या बाथरूममधून बंदुकीच्या गोळीचा आवाज आला.
- त्यानंतर: दुसरी गोळी फायर झाल्यावर कुटुंबीयांनी बेडरूममध्ये धाव घेतली असता डॉ. शिरीष वळसंगकर हे रक्ताच्या थारोळ्यात आढळले.
- रात्री ९ वा.: त्यांना तातडीने त्यांच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- पुढील पाऊण तास: मुलगा डॉ. अश्विन आणि सून डॉ. शोनाली यांच्यासह ५ तज्ञ डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.
- रात्री १०:२० मिनिटांनी: डॉ. शिरीष वळसंगकर यांना मृत घोषित करण्यात आले.
- रात्री १०:३० वा.: पोलीस उपायुक्त विजय कबाडे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बेडरूम सील केले.
- रात्री १०:४५ वा.: फॉरेन्सिकची टीम दाखल झाली आणि बेडरूममधील बंदूक, काडतूस आणि रक्ताचे नमुने गोळा केले.
या घटनेमुळे सोलापूरच्या वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून, डॉ. वळसंगकर यांच्यासारख्या ख्यातनाम डॉक्टरांच्या अशा एक्झिटने अनेकांना धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.