भूम – भूम पोलिसांनी परंडा रोडवर केलेल्या एका मोठ्या कारवाईत कत्तलीसाठी अत्यंत निर्दयतेने गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारा एक आयशर टेम्पो पकडला आहे. या टेम्पोमधून तब्बल ७९ जनावरे (वासरे व गायी) जप्त करण्यात आली असून, चालकाविरुद्ध विविध कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भुम पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, १८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लहुजी नगर, भुम ते परंडा जाणारे रोडच्या कडेला पोलिसांनी संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या एका आयशर टेम्पोची (क्र एमएच ४२ बी.८८०४) पाहणी केली.
यावेळी टेम्पोमध्ये फारुख अमीन सय्यद (वय २१, रा. खडकत ता. आष्टी जि. बिड) हा उपस्थित होता. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यांना धक्काच बसला. टेम्पोमध्ये गोवंशीय जातीचे ७८ वासरे आणि १ जर्शी गायी असे एकूण ७९ जनावरे कोंबली होती. धक्कादायक बाब म्हणजे, या जनावरांच्या चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती आणि त्यांना अत्यंत निर्दयतेने आणि बेकायदेशीर रित्या कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे समोर आले.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत १ लाख ८ हजार रुपये किमतीची ही जनावरे आणि वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो असा एकूण ६ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी भुम पोलिसांनी सरकारतर्फे आरोपी फारुख अमीन सय्यद याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(अ), ५(ब), ९, ९(अ), प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११ (डी) (ई) (ऐ) (ठ) आणि भारतीय न्याय संहिता कलम ३२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास भुम पोलीस करत आहेत.