उमरगा : बारामतीला कामावर परत जाण्यासाठी मध्यरात्री वाहनाची वाट पाहत थांबलेल्या एका ५५ वर्षीय वॉचमनला ऑटोतून आलेल्या तिघांनी चाकू व रॉडने जबर मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना उमरगा शहरात घडली. याप्रकरणी उमरगा पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवत १२ तासांच्या आत दोन आरोपींसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली आहे. त्यांच्याकडून लुटलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी आदिनाथ निवृत्ती गायकवाड (वय ५५ वर्षे, व्यवसाय-वॉचमन, रा. जवळगाबेट, ता. उमरगा, सध्या रा. समता नगर, मुबारकपूर, ता. निलंगा) हे निलंगा येथे आंबेडकर जयंतीसाठी आले होते. जयंती कार्यक्रमानंतर ते नारंगवाडी येथे आपल्या मेहुण्याला भेटून २२ एप्रिल २०२५ रोजी रात्री उमरगा चौकात बारामतीला कामावर जाण्यासाठी आले. रात्रीचे बारा वाजले तरी वाहन मिळत नसल्याने, ते मध्यरात्रीनंतर सुमारे सव्वाबारा वाजता उमरगा चौकातून लातूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनाची वाट पाहत थांबले होते.
त्यावेळी काळ्या रंगाच्या ऑटोरिक्षामधून (क्र. MH-25-M-1455) अंदाजे २० ते २५ वयोगटातील दोघे आणि १८ ते २० वयोगटातील एक, असे तिघे जण आले. त्यांनी गायकवाड यांचे खिसे तपासले आणि त्यांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. गायकवाड यांनी विरोध केला असता, तिघांनी त्यांना जबरदस्तीने ऑटोत बसवून उमरगा बायपास रोडवर कोरेगाववाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेले. तेथे ऑटो थांबवून त्यांना लाथाबुक्क्यांनी, रॉडने हातावर, पायावर, पाठीवर आणि डोक्यावर मारहाण केली. एकाने चाकूने त्यांच्या नाकावर, छातीवर आणि दंडावर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील दोन मोबाईल फोन (एक एमआय आणि एक इन्फिनिक्स कंपनीचा), एक चांदीच्या रंगाचे मनगटी घड्याळ आणि रोख ५५५० रुपये असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि त्यांना जखमी अवस्थेत तेथेच सोडून पळ काढला.
घटनेनंतर गायकवाड यांनी २३ एप्रिल २०२५ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून (गु.र.नं.२४९/२०२५) तपास सुरू केला. घटनास्थळी कोणताही पुरावा किंवा धागादोरा नसताना पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले आणि पोलीस उपनिरीक्षक गजानन पुजरवाड यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवली.
या माहितीच्या आधारे हा गुन्हा १) अभिषेक कालिदास शिंदे (वय २२), २) गणेश गोपाळ मडोळे (वय २३) आणि ३) १७ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालक (सर्व रा. मुन्शी प्लॉट, उमरगा) यांनी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी अभिषेक शिंदे आणि गणेश मडोळे यांना २४ एप्रिल २०२५ रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना २५ एप्रिल २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विधीसंघर्षग्रस्त बालकाला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून लुटलेले दोन्ही मोबाईल फोन, मनगटी घड्याळ, २५५० रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेला चाकू व स्टीलचा रॉड आणि गुन्ह्यात वापरलेली ऑटोरिक्षा असा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, पोलीस उपनिरीक्षक गजानन पुजरवाड, पोहेकॉ वाल्मिक कोळी, पोहेकॉ शिंदे, पोकॉ भागवत घाटे, पोकॉ सिध्देश्वर उंबरे, चालक पोकॉ राजेश वादे यांच्या पथकाने यशस्वी केली.