धाराशिव: तुळजापूर येथील गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेला पदार्थ हा एमडी (MD) हा अंमली पदार्थच असल्याचे प्रयोगशाळा तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. या अहवालामुळे अटक करण्यात आलेल्या आणि फरार असलेल्या आरोपींच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
काय आहे प्रकरण?
तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये १४ फेब्रुवारी २०२५ रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला पोलिसांनी अमित उर्फ चिमु अशोकराव आरगडे, युवराज देविदास दळवी (दोघेही रा. तुळजापूर) आणि संदीप संजय राठोड (रा. नळदुर्ग) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून २.५ लाख रुपये किमतीच्या, ४५ ग्रॅम वजनाच्या एमडी ड्रग्जच्या ५९ पुड्या, गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन आणि मोबाईल असा एकूण १० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
प्रयोगशाळा अहवालाने शिक्कामोर्तब
पोलिसांनी जप्त केलेल्या पदार्थाचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. नुकताच याचा अहवाल प्राप्त झाला असून, जप्त केलेला पदार्थ हा एमडी ड्रग्जच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पुराव्यामुळे आरोपींवरील गुन्ह्याचे गांभीर्य वाढले आहे.
तपासाची सद्यस्थिती
या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे गेला, तसतशी आरोपींची संख्या वाढत जाऊन ३६ वर पोहोचली. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत केवळ १४ आरोपींनाच अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे, तर तब्बल २२ आरोपी अजूनही फरार आहेत. गेल्या दीड महिन्यापासून एकाही नवीन आरोपीला अटक न झाल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जामीन अर्जांवर सुनावणी
दरम्यान, फरार आरोपींपैकी स्वराज्य उर्फ पिनू तेलंग (रा. तुळजापूर) आणि इंद्रजित उर्फ मिठू ठाकूर (रा. नळदुर्ग) यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाराशिव जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने त्यांचे अर्ज फेटाळून लावले आहेत.
तसेच, अटकेत असलेल्या सहा आरोपींनी आणि फरार असलेला वैभव गोळे (रा. मुंबई) अशा एकूण सात जणांनी नियमित जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जांवर आज (३० एप्रिल २०२५) सुनावणी पूर्ण झाली असून, न्यायालय आपला निर्णय २ मे २०२५ रोजी देणार आहे.
या प्रकरणात पोलिसांनी १० हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. मात्र, २२ आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. आता न्यायालयाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.