धाराशिव: अहो, काय सांगायची गोष्ट! आपल्या धाराशिव शहरात सध्या विनोदाला उधाण आलंय बघा. एका बाजूला प्रशासनात ‘डोकं’ चालवण्याचे प्रकार सुरू आहेत, तर दुसरीकडे पत्रकारितेतले काही ‘हुशार’ प्राणी (ज्यांना प्रेमाने ‘गाढव’ म्हटलं जातंय) स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतायत. झालंय काय, ते सविस्तर वाचाच!
अतिक्रमणाचा ताप अन् ‘डोके’ साहेबांचा प्रताप!
सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली सोलापूर रोडवरच्या अतिक्रमणावरून. कलेक्टर साहेबांनी नगरपालिकेच्या मुख्य मॅडमला थेट कारणे दाखवा नोटीस बजावली – बाबांनो, हे अतिक्रमण का नाही काढलं? आता इथंपर्यंत सगळं ठीक होतं. पण म्हणतात ना, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! याच प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन कनिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करा, असा थेट आदेश कलेक्टर साहेबांनी दिला होता.
पण इथेच एंट्री झाली आपल्या ‘डोके’ नावाच्या जिल्हा सहआयुक्तांची (नगर विकास प्रशासन). नाव ‘डोके’ असलं तरी त्यांनी आपलं डोकं भलतीकडेच चालवलं म्हणे! कलेक्टर साहेबांचा आदेश थेट केराच्या टोपलीत (कचराकुंडीत) फेकून दिला आणि निलंबित करायची नोटीसच गायब केली! का? तर म्हणे, नगरपालिकेच्या प्रभारी आरोग्य निरीक्षक तथा विद्युत अभियंत्याच्या दोन ‘चिंधीचोर’ कंत्राटदार मित्रांनी ‘डोके’ साहेबांशी काहीतरी ‘डील’ केली. आता या डीलने ‘डोके’ साहेबांचं डोकं असं काही फिरलं की, कलेक्टरचा आदेश पण त्यांना दिसेनासा झाला!
‘गाढवा’ला पकडलं अन् १ हजारात विकलं?
आता हे प्रकरण दाबण्यासाठी त्या दोन कंत्राटदारांनी आणखी एक ‘डोकं’ लढवलं. त्यांनी शहरातला पत्रकारितेतला एक ‘न लिहिणारा’ पण रुबाब मारणारा ‘गाढव’ पकडला. त्याला हजाराची नोट दाखवली आणि एक फेक न्यूज तयार करायला सांगितली. गंमत म्हणजे, या ‘न लिहिणाऱ्या गाढवाने’ दुसऱ्या एका ‘कारकून गाढवा’कडून ती बातमी लिहून घेतली आणि एका ठरलेल्या ईमेल आयडीवरून सगळ्या पत्रकारांना पाठवून दिली. प्लॅन एकदम फिक्स होता!
पण म्हणतात ना… अतिशहाणा त्याचा…!
इथेच तर खरी मेख होती! ज्यांच्या विरोधात हे सगळं कारस्थान रचलं गेलं होतं, त्यांच्यापर्यंत पण ही बातमी पोहोचली. त्यांनी काय केलं असावं? त्यांनी पण त्याच ईमेल आयडीवरून, तीच फेक न्यूज कॉपी केली आणि सगळ्या पत्रकारांना दुसरा मेल पाठवला – “अहो मंडळी, चूक झाली! मगाशी आलेली बातमी नजरचुकीने आलीये, पूर्णपणे चुकीची आहे, कुणी चुकूनसुद्धा छापू नका!”
…आणि बाजार उठला!
आता सांगा, पत्रकार काय करणार? एकतर त्या ईमेल आयडीवरून आलेल्या बातम्या कोण मनावर घेत नाही, त्यात परत “बातमी चुकीची आहे, छापू नका” असा अधिकृत (?) खुलासा! झालं! बिच्चारा ‘न लिहिणारा गाढव’ तोंडावर आपटला. हजाराचं पाकीट पण गेलं आणि इज्जत पण! बातमी छापायच्या आधीच तिची रद्दी झाली.
तर, अशी ही धाराशिवची हटके स्टोरी! इथे ‘डोकं’ चालवणारे पण फसतात आणि ‘गाढवं’ पण तोंडावर पडतात! आता पुढे काय होतंय, ते बघूया!