धाराशिव: तर मंडळी, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आजच्या’गौप्यस्फोट’ प्रकरणानंतर वाटलं होतं की आता शांतता नांदेल. पण नाही! पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी फक्त २६८ कोटींच्या स्थगितीचं कारण सांगून विषय संपवला नाही, तर थेट ‘इस्तीफा लेटर’ खिशात असल्याचाच इशारा दिला राव!
त्यांनी सांगितलं की , भाजप आमदार राणा पाटलांच्या ‘तोंडी’ तक्रारीमुळे मुख्यमंत्र्यांनी कामांना स्थगिती दिली. पण त्यावर कडी करत ते म्हणाले, “बघा, जर माझीच कुणाला अडचण असेल, माझ्याबद्दलच तक्रार असेल, तर मी आत्ताच्या आत्ता पालकमंत्री पद सोडायला तयार आहे!” अरे देवा! म्हणजे थेट ओपन चॅलेंज!
पुढे ते म्हणाले, “मला मुख्यमंत्री फडणवीस आणि आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जबाबदारी दिलीये, धाराशिवचा विकास करायचा आहे, राजकारण नाही. पण जर असं अविश्वासाचं वातावरण असेल, तर विकास कसा होणार?” म्हणजे पालकमंत्री एका बाजूला विकासाची बॅटिंग करत असताना, दुसरीकडे राजकारणाचे ‘बाउन्सर’ टाकले जात आहेत, असं त्यांचं म्हणणं!
पण खरी कहाणी आता सुरू होतेय!
हे प्रकरण फक्त पालकमंत्री (शिवसेना-शिंदे गट) विरुद्ध आमदार (भाजप) एवढंच नाहीये. यामागे आहे धाराशिवच्या राजकारणातला एक जुना, पण फेमस ‘३६ चा आकडा’!
गोष्ट अशी आहे की, भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना मंत्री होऊन जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायची लय इच्छा होती. पण मंत्रीपदाची लॉटरी काही लागली नाही. त्यात भर म्हणून, जे नवीन पालकमंत्री आले (आपले सरनाईक साहेब), ते योगायोगाने खासदार ओमराजे निंबाळकर यांचे ‘खास दोस्त’ निघाले!
आणि इथेच खरी मेख आहे! खासदार ओमराजे आणि आमदार राणा पाटील हे आहेत चुलत भाऊ, पण राजकारणातले कट्टर वैरी! त्यांच्यातला ‘३६ चा आकडा’ अख्ख्या जिल्ह्याला माहीत आहे. आता आपल्या कट्टर विरोधकाचा जिगरी दोस्तच जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यावर आमदार साहेबांना ‘सल’णार नाही तर काय?
त्यामुळे, मुख्यमंत्र्यांकडे झालेली ती ‘कानाफुसी’ खरंच फक्त कामातल्या गडबडीबद्दल होती, की या सगळ्या पार्श्वभूमीवरचा एक राजकीय डाव होता, यावर आता पारावरच्या गप्पा रंगू लागल्या आहेत!
थोडक्यात काय: २६८ कोटींच्या स्थगिती नाट्याला आता भाऊबंदकी, राजकीय महत्त्वाकांक्षा आणि जुन्या वैराचा तडका मिळाला आहे. पालकमंत्री सरनाईक यांच्या ‘इस्तीफा ऑफर’ने तर यात आणखी तेल ओतलंय. महायुतीत पडलेला हा ‘मिठाचा खडा’ आता संबंध बिघडवणार की नेतेमंडळी समेट घडवून आणणार, हे पाहणं लय इंटरेस्टिंग ठरणार आहे! Stay tuned!