धाराशिव – शेतजमिनीच्या नोंदीतून कुळाचे नाव कमी करून त्याचा अहवाल तहसीलदारांना सादर करण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वाघोली (ता. जि. धाराशिव) सज्जाचा तलाठी आणि त्याच्या एका खाजगी साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज, सोमवार, दि. ५ मे २०२५ रोजी वाघोली येथील तलाठी कार्यालयात करण्यात आली.
भूषण वशिष्ठ चोबे (वय ३१, तलाठी, सज्जा वाघोली, मूळ रा. शिरसावा, ता. परांडा, सध्या रा. आदर्श नगर, धाराशिव) आणि भारत शंकर मगर (वय ६४, खाजगी लिपिक, रा. वाघोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी एका ३३ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेत गट नंबर १५/१० मधील कुळाचे नाव कमी करण्यासाठी त्यांनी तहसील कार्यालय, धाराशिव येथे अर्ज केला होता. तहसीलदारांनी या अर्जावर चौकशी करून स्थळपाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश मंडळ अधिकाऱ्यांमार्फत तलाठ्याला दिले होते.
मात्र, हा अहवाल देण्यासाठी तलाठी भूषण चोबे आणि त्याचा खाजगी मदतनीस भारत मगर यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने आजच (०५ मे २०२५) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव यांच्याकडे संपर्क साधून तक्रार दिली.
ACB च्या पथकाने या तक्रारीची तात्काळ पडताळणी केली. वाघोली येथील तलाठी कार्यालयात झालेल्या पडताळणीत, तलाठी चोबे याने खाजगी लिपिक मगर याच्यामार्फत पंचांसमक्ष ५ हजार रुपयांची मागणी केली आणि तडजोडीअंती ४ हजार रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवली.
यानंतर ACB पथकाने सापळा रचला. आज दुपारी तलाठी कार्यालयातच खाजगी लिपिक भारत मगर याने तक्रारदाराकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने दोघांनाही रंगेहाथ पकडले.
आरोपींकडून जप्त मुद्देमाल:
- तलाठी भूषण चोबे: ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, ३० ग्रॅम चांदीचे कडे, सॅमसंग कंपनीचा मोबाईल, पार्कर पेन, डेल कंपनीचा शासकीय लॅपटॉप.
- खाजगी लिपिक भारत मगर: लाचेची रक्कम ४००० रुपये, अतिरिक्त १०९० रुपये रोख, सॅमसंग कंपनीचा साधा कीपॅड मोबाईल.
आरोपींच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी तलाठी भूषण चोबे याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम १२ अन्वये आणि खाजगी लिपिक भारत मगर याच्याविरुद्ध कलम ७(अ) अन्वये धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. दोघांनाही अटक करून पुढील तपास केला जाणार आहे. त्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांची तपासणी केली जाईल.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव युनिटचे पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे पथक (पोलीस अंमलदार नेताजी अनपट, आशिष पाटील, नागेश शेरकर) यांनी यशस्वी केली.
भ्रष्टाचाराची तक्रार कुठे करावी?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, भ्रष्टाचारासंबंधी कोणतीही तक्रार असल्यास टोल-फ्री क्रमांक १०६४ किंवा पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजी नगर (९९२३०२३३६१) किंवा पोलीस उपअधीक्षक, धाराशिव (९५९४६५८६८६) यांच्याशी संपर्क साधावा.