धाराशिव: धाराशिव शहरातील कचरा डेपो प्रश्नाच्या श्रेयावरून भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) आणि ठाकरे गटाच्या युवा सेनेत कलगीतुरा रंगला आहे. भाजयुमोने केलेल्या दाव्यांवर युवा सेनेचे शहरप्रमुख रवी वाघमारे यांनी जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. “कचरा डेपोचा प्रश्न गंभीर आहे आणि तो सुटेलही, पण चार वर्षांपूर्वीच्या आंदोलनामुळे तो सुटला असे म्हणणाऱ्या भाजयुमो जिल्हाध्यक्षांनी आधी स्वतःच्या मेंदूची तपासणी करावी,” असा सणसणीत टोला वाघमारे यांनी लगावला आहे.
एका प्रसिद्धीपत्रकात वाघमारे यांनी म्हटले आहे की, भाजयुमोने २०२१ मध्ये कचरा डेपो प्रश्नावर आंदोलन केले होते, हे खरे असले तरी त्यावेळी त्यांची मागणी डेपो हटवण्याची नव्हती. तसेच, त्या आंदोलनामुळे आता, चार वर्षांनी, प्रश्न मार्गी लागला असे म्हणत स्वतःची पाठ थोपटून घेणे हे हास्यास्पद आणि ‘मेंदू नसल्याचे लक्षण’ आहे.
वाघमारे यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सांगितले की, “जेव्हा भाजयुमोने आंदोलन केले, तेव्हा नगरपालिकेत भाजपचाच उपनगराध्यक्ष सत्तेत होता. म्हणजे त्यांनी स्वतःच्याच पक्षाच्या कारभाराविरोधात आंदोलन केले होते का? त्यानंतर नगरपालिका प्रशासकाच्या हाती गेली. काही काळातच फोडाफोडी करून भाजप राज्यात सत्तेत आली. तेव्हापासून केंद्र, राज्य आणि (प्रशासकामार्फत) नगरपालिकेत भाजपचेच वर्चस्व होते. मग इतकी वर्षे हा प्रश्न का सुटला नाही?”
आता महायुती सरकारचे पालकमंत्री हा प्रश्न मे अखेरपर्यंत मार्गी लावणार असल्याचे सांगत आहेत. इतक्या उशिराने प्रश्न सुटत असताना चार वर्षांपूर्वीच्या आंदोलनाचे श्रेय घेणे म्हणजे ‘हसावे की रडावे’ अशी परिस्थिती असल्याचे वाघमारे म्हणाले.
“जर भाजयुमोच्या आंदोलनामुळे प्रश्न इतक्या वर्षांनी सुटत असतील, तर त्यांनी आता जिल्ह्यातील गंभीर ड्रग्ज प्रकरणावरही असेच एखादे आंदोलन करावे, म्हणजे तो प्रश्नही कचरा डेपोप्रमाणे आपोआप मार्गी लागेल,” असे उपरोधिक आव्हानही रवी वाघमारे यांनी भाजयुमोला दिले आहे.