धाराशिव: अहो आश्चर्यम्! धाराशिव शहराच्या डोक्याला वर्षानुवर्षे ताप देणारा कचरा डेपो अखेर हलेल, अशी आशा पल्लवित झाली आहे. पण थांबा! खरी बातमी ही नाही. खरी बातमी तर ही आहे की, हा कचरा डेपो हलण्याआधीच त्याच्या क्रेडिटसाठी राजकीय पक्षांमध्ये अशी काही जुंपली आहे, जणू काही ऑलिम्पिकचं सुवर्णपदक जिंकलंय!
ऍक्शन हिरो: ठाकरे गट!
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या युवा सेनेने कचरा डेपो हटवण्यासाठी रणशिंग फुंकले होते. कधी आमरण उपोषण (ज्याने प्रशासनाला नाही, पण उपाशी कार्यकर्त्यांना नक्कीच फरक पडला!), कधी घंटानाद आंदोलन (ज्याने कदाचित डेपोतील कचऱ्याला जाग आली असेल, पण प्रशासनाचे कान बंदच!), तर कधी कचऱ्याची होळी (धूर तर आधीच होत होता, त्यात ही भर!). त्यांच्या या ‘धुरळा’ उडवणाऱ्या आंदोलनानंतर पालकमंत्री महोदयांनी ‘मे एंड’पर्यंत प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं. झालं! इथूनच खरी ‘कचरा-कॉमेडी’ सुरू झाली.
‘हम भी थे!’ – भाजपचा रेट्रो क्लेम!
ठाकरे गटाच्या आंदोलनाला यश मिळण्याची चिन्हं दिसताच, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी थेट २०२१ सालची आंदोलनाची धूळ झटकली. “अहो, आम्ही तेव्हाच सांगितले होते! आम्ही कचऱ्याची होळी केली होती! तेव्हा कुठे होता हा ठाकरे गट?” असा सवाल करत त्यांनी थेट ठाकरे गटावर ‘नाकर्तेपणा’ आणि सत्तेत असताना ‘टक्केवारीत’ रमल्याचा आरोप केला. जणू काही चार वर्षांपूर्वी लावलेल्या आंब्याच्या झाडाला आता आंबे लागले, म्हणून झाड लावण्याचं क्रेडिट घ्यायला धावलेत!
त्यांच्या म्हणण्यानुसार, भाजपच्या ‘सातत्यपूर्ण’ (म्हणजे चार वर्षांपूर्वी केलेल्या) आंदोलनामुळेच आता कचरा डेपो हलतोय. ठाकरे गट तर फक्त आयत्या पिठावर रेघोट्या ओढतोय! (आणि हो, त्यांच्या या ‘जोरदार’ दाव्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत, असंही त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे बघा, कचरा डेपोच्या वासाने कार्यकर्तेही इकडून तिकडे व्हायला लागलेत!)
‘मेमरी लॉस की ब्रेन फेल?’ – ठाकरे गटाचा प्रतिहल्ला!
भाजपच्या या ‘फ्लॅशबॅक’ क्लेमवर ठाकरे गटाचे शहरप्रमुख रवी वाघमारे चांगलेच उखडले. “काय राव! चार वर्षांपूर्वीच्या आंदोलनामुळे आता प्रश्न सुटतोय? हे तर ‘मेंदू तपासण्याची’ गरज असल्याचं लक्षण आहे,” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. “बरं, जेव्हा तुम्ही आंदोलन केलं म्हणता, तेव्हा पालिकेत तुमचाच उपनगराध्यक्ष होता ना? मग स्वतःच्याच कारभारावर आंदोलन करत होता का? आणि नंतर राज्यात, केंद्रात सगळीकडे तुम्हीच! मग इतकी वर्षे काय कचऱ्यासोबत फोटोसेशन करत होता?” असे बोचरे सवालही त्यांनी विचारले.
वाघमारे इथेच थांबले नाहीत. “जर तुमच्या आंदोलनात इतकी ताकद आहे की चार वर्षांनी प्रश्न सुटतात, तर आता जरा ड्रग्जच्या प्रश्नावर पण एक आंदोलन करा की राव! म्हणजे तो पण आपोआप सुटेल,” असा उपरोधिक सल्लाही देऊन टाकला.
जनता म्हणते: ‘आधी वास घालवा रे बाबा!’
एकंदरीत काय, तर धाराशिवच्या हवेत सध्या कचऱ्याच्या धुरासोबत राजकीय श्रेयाच्या लढाईचाही ‘सुगंध’ (!) दरवळतो आहे. नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या कचऱ्याचे ढीग टाकत आहेत. पण बिचारी जनता? ती फक्त नाक दाबून म्हणतेय, “अरे बाबांनो, कोणीही क्रेडिट घ्या, पण आधी हा डेपो हटवा आणि आमची या दुर्गंधीतून सुटका करा!” आता पाहायचं, हा कचरा डेपो आधी हलतो की या श्रेयवादाच्या लढाईचा निकाल आधी लागतो!