तुळजापूर: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून आणि पोलिसांचा खोटा जबाब समाजमाध्यमांवर प्रकाशित करून बदनामी केल्याप्रकरणी तुळजापूर येथील एका तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजा माने असे या कार्यकर्त्याचे नाव असून, विशाल छत्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजा माने याने स्वतःहून एक बनावट कागदपत्र तयार केले. हे कागदपत्र म्हणजे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी “पोलिसांनी घेतलेला जबाब” असल्याचे त्याने भासवले. या बनावट जबाबात विशाल छत्रे यांचे नाव ड्रग्ज प्रकरणाशी जोडून खोट्या व निराधार स्वरूपात माहिती माध्यमातून प्रकाशित केली. इतकेच नव्हे तर, हे बनावट कागदपत्र त्याने समाजमाध्यमांवर प्रसारित करून जाणीवपूर्वक बदनामी केल्याचे विशाल छत्रे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली असता, अशा प्रकारचा कोणताही अधिकृत जबाब पोलिसांनी घेतलेला नाही आणि न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेल्या दोषारोपपत्रातही अशा कोणत्याही जबाबाचा उल्लेख नाही, असे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही, बनावट दस्तऐवजाची पोलीस दफ्तरी आणि न्यायालयात दाखल दोषारोपपत्रात नोंद असल्याचे भासवून आपल्यावर खोटे आरोप करून आपल्या प्रतिष्ठेला आणि सामाजिक प्रतिमेला हानी पोहोचवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न राजा माने याने काहीजणांच्या मदतीने केला असल्याचे विशाल छत्रे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी राजा माने याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ (Bharatiya Nyaya Sanhita) अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कलम ३३५, ३३६ (खोटी माहिती किंवा दस्तऐवज तयार करणे), कलम ३३७ (बनावट न्यायालयीन अभिलेख तयार करणे), कलम ३३९ (एखादा दस्तऐवज खोटा आहे हे माहीत असताना फसवण्यासाठी वापरण्याची योजना आखणे) आणि कलम ३४० (बनावट दस्तऐवज अस्सल म्हणून वापरणे) यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.