अखेर तो सुदिन(?) उजाडला! धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीचा बार येत्या चार महिन्यांत उडणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि गेली तीन वर्षे प्रशासकांच्या राजवटीत सुस्तावलेले (की घुसमटलेले?) भावी नगरसेवक एकदम ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. जणू काही ‘अच्छे दिन’ येण्याच्या केवळ घोषणेनेच त्यांच्या चेहऱ्यावर बारा वाजल्याची घड्याळे अचानक चालू झाली आहेत. न्यायालयाने फर्मान सोडले, “बाळांनो, चार महिन्यांत निवडणूक घ्या!” आणि काय आश्चर्य, अनेकांच्या पोटात गेली तीन वर्षे खड्डा पाडणाऱ्या ‘प्रशासकीय राजवटी’चा खड्डा बुजल्याचा आनंद झाला.
धाराशिव, नावातच ‘शिव’ असले तरी सध्या शहराची अवस्था ‘नाव सोनुबाई, हाती कथलाचा वाळा’ अशी काहीशी झाली आहे. जिल्ह्याचे ठिकाण असूनही विकास नावाचा प्राणी इथे फक्त कागदोपत्री आणि भाषणांपुरता दिसतो, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.
विकास यात्रा: ३०० कोटी गटारात, जनता खड्ड्यात!
शहराच्या विकासाचा ‘महामेरू’ म्हणून गाजावाजा झालेली ३०० कोटींची भुयारी गटार योजना सध्या धाराशिवकरांसाठी ‘गळ्यातील हड्डी’ बनली आहे. या योजनेने रस्त्यांची अक्षरशः ‘चाळण’ केली आहे. गेली दोन वर्षे झाली, धाराशिवकर ‘खड्डा शोध’ स्पर्धेत न चुकता भाग घेत आहेत. उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य तर पावसाळ्यात प्रत्येक खड्डा जणू ‘मिनी स्विमिंग पूल’. वाहनचालकांची अवस्था तर ‘इकडे आड तिकडे विहीर’ नव्हे, तर ‘इकडे खड्डा, तिकडेही खड्डाच’ अशी झाली आहे. या खड्डेमय प्रवासाने अनेकांच्या कंबरेचे आणि गाडीच्या टायरचे ‘थ्री पीस’ केले आहेत.
दुर्दैवाने, काही दिवसांपूर्वी एका तरुणाला याच खड्ड्यांनी गिळंकृत केले. मोटारसायकल खड्ड्यात आदळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि जनतेचा संताप अनावर झाला. “रस्ता करा, नाहीतर खुर्च्या खाली करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
राजकारणाचा ‘खड्डा’, कोण कुणाचा गड्डा?
या आंदोलनाच्या फडात शिवसेना (ठाकरे गट) लगेच उतरली. पण म्हणतात ना, ‘चोराच्या उलट्या बोंबा’. नंतर हळूच कळले की, या रस्त्याच्या दुर्दशेला कारणीभूत असलेले दोन ‘चिंधीचोर’ कंत्राटदार म्हणे याच पक्षाच्या वळचणीला होते आणि त्यांनी कामच केले नव्हते! पण पक्षाने लगेच सारवासारव करत म्हटले, “ते आमचे कार्यकर्ते नव्हतेच मुळी! आणि बघा ना, १४० कोटी रस्त्यांसाठी आलेत, पण सत्ताधारी काम सुरू करू देत नाहीत.”
आता ही १४० कोटींची गुळणी एका सत्ताधारी नेत्याच्या लाडक्या कंत्राटदाराच्या घशात अडकली आहे. विशेष म्हणजे, यात त्यांच्या दोन कार्यकर्त्यांची (आणि आता कंत्राटदाराचीही) पार्टनरशिप असल्याची चर्चा आहे. या महाशयांनी काम सुरू करण्याऐवजी आणखी १५ टक्के जास्त, म्हणजे तब्बल २२ कोटींची ‘वरकमाई’ मागितल्याने नवाच पेच निर्माण झाला.
ठाकरे सेनेने थेट पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रारीचा पाढा वाचला. मग काय, सरकारकडून एक ‘प्रेमपत्र’ आले की, “अहो अजमेरा शेठ, १४० कोटींचे टेंडर तुम्हाला मिळाले आहे, काम करा नाहीतर सोडून द्या. आम्ही नवीन ‘शिकार’ शोधू.” झाली ना कंत्राटदाराची ‘भू कोंडी’!
हा अजमेरा नावाचा अवलिया तर म्हणे, “मी ॲपल दर्जाचा रस्ता बनवणार!” पण सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व्हिस रोडची अवस्था बघता, तो ‘रेडमी’च्या लायकीचाही नसल्याचे नागरिक उघडपणे बोलत आहेत.
आता हाच ‘खड्डेमय’ आणि ‘कमिशनमय’ रस्ता निवडणुकीच्या रिंगणातला प्रमुख मुद्दा ठरणार, यात शंका नाही. नेतेमंडळी आश्वासनांची ‘पुंगी’ वाजवणार आणि जनता बिचारी… तिच्या हाती काय लागणार, हे येणारा काळच ठरवेल! पण सध्या तरी धाराशिवकर ‘खड्ड्यांतून वाट आणि पुंगीचा नाद’ अनुभवत आहेत, हे मात्र नक्की!
– बोरूबहाद्दर