धाराशिव: शहरात गोवंश मांसाची अवैध वाहतूक आणि विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन व्यक्तींना शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. ही घटना गुरुवार, दि. ०८ मे २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास वैरागनाकाकडे जाणाऱ्या रोडवर, स्मशानभूमीजवळ घडली. पोलिसांनी या कारवाईत सुमारे ९ लाख रुपये किमतीचे ३,००० किलो गोवंश मांस जप्त केले आहे.
या प्रकरणी समीद वजीर शेख (वय ३३ वर्षे, रा. आरणी, ता. जि. धाराशिव, ह.मु. उमर चौक, खाजानगर, धाराशिव) आणि संदीप ज्ञानदेव गायकवाड (वय ३४ वर्षे, रा. बालाजी नगर, धाराशिव) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एमएच ४३ यु २७४७ या क्रमांकाच्या टेम्पोमधून गोवंशाचे मांस विक्रीसाठी घेऊन जात होते. गुप्त माहितीच्या आधारावर धाराशिव शहर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. टेम्पोची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात गोवंश मांस आढळून आले.
याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाच्या कलम ५(सी) आणि ९(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.