तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कार्यालयात एका पुजाऱ्याने मद्यपान करून गोंधळ घातल्याची आणि तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनुप कदम असे या पुजाऱ्याचे नाव असून, मंदिर संस्थानने दिलेल्या कारणे दाखवा नोटिशीचा राग मनात धरून त्यांनी हे कृत्य केल्याचे समजते. याप्रकरणी त्यांच्यावर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ एप्रिल २०२५ रोजी अनुप कदम यांनी मंदिराच्या व्हीआयपी गेटवर सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने मंदिरात प्रवेश केला होता. यानंतर १५ एप्रिल २०२५ रोजी त्यांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, श्री तुळजाभवानी संस्थान यांच्या दालनात कार्यालयीन कामकाज सुरू असताना अप्पर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांशी अर्वाच्य भाषेत हुज्जत घातली. एवढेच नाही तर त्याच दिवशी कदम यांनी श्री तुळजाभवानी संस्थान कार्यालयातील सीसीटीव्ही कंट्रोल रूमच्या दरवाजाला लाथ मारून तो उघडला. सुरक्षेच्या कारणास्तव या रूममध्ये वरिष्ठांच्या परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
या घटनांची सीसीटीव्ही फुटेजद्वारे खात्री केल्यानंतर मंदिर संस्थान प्रशासनाने १२ मे २०२५ रोजी अनुप कदम यांना देऊळ कवायत कायद्याच्या कलम २४ व २५ नुसार “मंदिरातील कायदा व सुव्यवस्थेस अडथळा निर्माण करणारे अशोभनीय वर्तन केल्याने तुमच्यावर तीन महिन्यांची मंदिर प्रवेश बंदी का करण्यात येऊ नये?” अशी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
या नोटिशीमुळे संतप्त झालेल्या अनुप कदम यांनी १३ मे २०२५ रोजी मद्यधुंद अवस्थेत मंदिर संस्थान कार्यालयात येऊन गोंधळ घातला. त्यांनी तहसीलदार तथा व्यवस्थापक, श्री तुळजाभवानी संस्थान यांच्या नावाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराची काच हाताने फोडली.
या घटनेनंतर मंदिर संस्थान प्रशासनाने तातडीने तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत अनुप कदम यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२१ (सरकारी कामात अडथळा), ३५२ (हल्ला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग), आणि ३२४(४) (धोकादायक शस्त्रांनी किंवा साधनांनी दुखापत करणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे मंदिर परिसरात आणि भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे.