कळंब – कळंब तालुक्यातील सावरगाव येथे एका माजी सैनिकाच्या घरावर मध्यरात्री दरोड्याचा भीषण प्रयत्न झाला. घरात घुसलेल्या चोरट्यांना माजी सैनिकाच्या कुटुंबीयांनी प्रतिकार केला असता, चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवत जबर मारहाण केली. या मारहाणीत माजी सैनिकाचे वयोवृद्ध वडील सदाशिव पारखे गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना तातडीने अंबाजोगाई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री साधारणपणे १ ते १:३० च्या सुमारास घडली. माजी सैनिक पारखे यांच्या घरात चार अज्ञात चोरटे चोरीच्या उद्देशाने घुसले. यावेळी घरात असलेले माजी सैनिकाचे वडील, सदाशिव पारखे यांनी चोरट्यांचा धाडसाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेल्या चोरट्यांनी त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला, ज्यात ते गंभीररित्या जखमी झाले.
भर वस्तीत आणि एका माजी सैनिकाच्या घरी घडलेल्या या धाडसी दरोड्याच्या प्रयत्नाने आणि मारहाणीच्या घटनेमुळे सावरगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच कळंब पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी केली असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.