धाराशिव: मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास धाराशिव शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर तुळजापूर रोडवरील पळसवाडीजवळ एक भीषण अपघात घडला. माजी अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या खासगी स्कॉर्पिओ गाडीला एका भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने गाडीचा चक्काचूर झाला. या अपघातात गौहर हसन आणि त्यांच्या पत्नी व सध्याच्या अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना गाडीत गंभीर जखमी अवस्थेत अडकले होते. मात्र, एका देवदूतासारख्या धावून आलेल्या जेसीबी चालकामुळे त्यांचे प्राण वाचले.
मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास गौहर हसन हे पत्नी शफकत आमना यांच्यासोबत त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीने प्रवास करत होते. पळसवाडीजवळ असताना एका भरधाव कंटेनरने त्यांच्या गाडीला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ गाडी कंटेनरखाली दबली गेली. त्यातच वादळी वारा आणि पाऊस सुरू असल्याने बचावकार्यात अडथळे येत होते.
या अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शकील शेख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी जेसीबी चालक आसिफ सत्तार कुरेशी यांना तातडीने फोन करून बोलावून घेतले. आसिफ कुरेशी यांनी क्षणाचाही विलंब न करता जेसीबीसह घटनास्थळ गाठले. त्यांनी अत्यंत कौशल्याने कंटेनरला बाजूला करून गाडीचा दरवाजा तोडला आणि गाडीत अडकलेल्या गौहर हसन व शफकत आमना यांना बाहेर काढले.
हसन दाम्पत्याला किरकोळ दुखापत:
अपघातात गौहर हसन यांच्या हाताला किरकोळ मार लागला आहे, तर त्यांच्या पत्नी शफकत आमना यांनाही थोडे खरचटले आहे. दोघांनाही तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
जेसीबी चालकाचा सत्कार:
जेसीबी चालक आसिफ सत्तार कुरेशी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि धाडसामुळेच माजी अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन आणि त्यांच्या पत्नी शफकत आमना यांचे प्राण वाचले. त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक शकील शेख यांनी पोलीस स्टेशनमध्ये पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याचे कौतुक केले. या घटनेमुळे आसिफ कुरेशी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Video