धाराशिव: शहरालगत असलेल्या एमआयडीसी, आरटीओ ऑफिस परिसरात लस्सी आणि कोल्ड्रिंक्स पिलेल्या पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून हॉटेल चालकाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर, आरोपींनी हॉटेलमधील सामानाची तोडफोड करून नुकसानही केले. ही घटना १२ मे २०२५ रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी हॉटेल चालक सोपान मारुती कोल्हे (वय ४१ वर्षे, रा. एमआयडीसी, आरटीओ ऑफिसजवळ, धाराशिव) यांनी १३ मे २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंगोली (ता. जि. धाराशिव) येथे राहणारा अक्षय बोराडे आणि त्याच्या दोन अज्ञात साथीदारांनी १२ मे रोजी रात्री सोपान कोल्हे यांच्या हॉटेलमध्ये येऊन लस्सी व कोल्ड्रिंक्स पिलेल्या बिलाचे पैसे देण्यावरून वाद घातला.
वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. आरोपींनी गैरकायदेशीरपणे जमाव जमवून फिर्यादी सोपान कोल्हे यांना शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने मारहाण करून त्यांना जखमी केले. यानंतर आरोपींनी हॉटेलमधील सामानाची तोडफोड करत मोठे नुकसान केले.
सोपान कोल्हे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे, अक्षय बोराडे आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११५(२) (दंगा), ३५२ (हल्ला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग), ३२४(२) (घातक शस्त्रांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे), १८९(२) (नुकसान), १९१(२) (धमकी) आणि १९० (अतिक्रमण) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.