तुळजापूर: श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांदरम्यान ऐतिहासिक मूर्तींची तोडफोड झाल्याने महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार, राज्य शासनाने मंजूर केलेल्या तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांदरम्यान मंदिर परिसरातील ऐतिहासिक मूर्तींची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून, हा प्रकार पूर्वनियोजित आणि दुर्लक्षामुळे घडल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
या प्रकरणी राज्य पुरातत्व विभाग, मंदिर संस्थान, संबंधित ठेकेदार आणि इतर दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे. जर प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही, तर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दुसऱ्या एका पत्राद्वारेही हेच मुद्दे अधोरेखित करण्यात आले असून, या घटनेमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून कारवाई करावी, अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे.
या निवेदनावर महाविकास आघाडीचे धीरज भैय्या पाटील, ऋषिकेश मगर, श्याम पवार, अमोल कुतवळ, सुधीर कदम, दीपक राज लोंढे, अमर चोपदार, उदय श्यामराज, कुलदीप लोंढे, राहुल खपले, बालाजी तर, अनमोल साळुंखे, नागनाथ भाऊ भांजी यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या सर्वांनी या घटनेबाबत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.