धाराशिव: भूम तालुक्यातील ईट येथे शुक्रवारी रात्री एक अत्यंत विचित्र आणि दुर्दैवी अपघात घडला. भरधाव वेगात जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सच्या उघड्या डिग्गीचा पत्रा लागल्याने १९ वर्षीय प्रवीण शिवाजी भोसले या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र विशाल आप्पा भोसले हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संतप्त जमावाने ट्रॅव्हल्स चालकाला मारहाण करत गाडीच्या काचा फोडल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, आक्का ट्रॅव्हल्सची एम एच ०१ सीआर ८१५४ क्रमांकाची बस शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता वाशी येथून ईट मार्गे पुण्याकडे निघाली होती. याच वेळी प्रवीण भोसले आणि विशाल भोसले हे दोघे मित्र मोटरसायकलवरून शेताकडे जात होते. ट्रॅव्हल्स भरधाव वेगात असताना तिच्या डिग्गीचा पत्रा उघडा होता.
मोटरसायकल चालवत असलेल्या विशाल आप्पा भोसले याला अचानक समोर ट्रॅव्हल्सच्या डिग्गीचा उघडा पत्रा दिसला. प्रसंगावधान राखत त्याने आपली मान खाली वाकवली, त्यामुळे तो थोडक्यात बचावला. मात्र, त्याच्या मागे बसलेल्या प्रवीण शिवाजी भोसले याच्या डोक्याला तो उघडा पत्रा जोरात लागला. हा आघात इतका गंभीर होता की प्रवीणचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतरही ट्रॅव्हल्स चालक या प्रकाराबद्दल अनभिज्ञ होता. त्याने बस ईट येथील थांब्यावर थांबवल्यानंतर जमावाने त्याला घेरले आणि घडलेल्या प्रकाराचा जाब विचारला. संतप्त जमावाने चालकाला मारहाण करत बसच्या काचा फोडल्या. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रवीण भोसले याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघातामुळे भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका क्षुल्लक निष्काळजीपणामुळे एका तरुण जीवाला प्राण गमवावे लागल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.