कळंब – कळंब शहरातील तहसील कार्यालयाजवळील एका महा ई-सेवा केंद्रात दुकानदाराला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दाताने चावा घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १८ मे २०२५ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
सुधिरकुमार बब्रुवान देवकर (वय ४० वर्षे, रा. महसूल कॉलनी, कळंब) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर बब्रुवान देवकर (रा. महसूल कॉलनी, कळंब) याने फिर्यादी सुधिरकुमार यांना ‘राहुल अंगराखे याला दुकानात का येऊ दिले?’ या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दाताने चावा घेऊन गंभीर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.
सुधिरकुमार देवकर यांनी १८ मे रोजीच दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलीस ठाण्यात आरोपी सागर देवकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११७(२) (शिवीगाळ करणे), ११५(२) (धमकी देणे), ३५२ (मारहाण करणे) आणि ३५१(२) (गंभीर दुखापत करणे) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.