धाराशिव: शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी आपापसात हाणामारी करून शांतता भंग केल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. १७ मे २०२५) रात्री साडेदहा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनुराधा अभिजीत शिंदे, अभिजीत शिंदे, अंबादास शिंदे, जगदीश शिंदे, भारत शिंदे, अर्जुन शिंदे, अर्जुन श्रीपती शिंदे, सतीश शिंदे आणि सिद्धेश्वर शिंदे (सर्व रा. खेड, ता. जि. धाराशिव) हे शनिवारी रात्री आनंदनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात एका सार्वजनिक ठिकाणी आपापसात हाणामारी करत होते. यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याचे गस्तीवर असलेल्या आनंदनगर पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी, पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरीवरून नमूद नऊ व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १९४(२) (सार्वजनिक शांतता भंग करणे) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११० (सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन), ११२ (शांतताभंगास चिथावणी देणे) आणि ११७ (कायद्याचे उल्लंघन) अन्वये आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.