मुरुम – उमरगा तालुक्यातील दास्तपूर गावाजवळील लोखंडी पादचारी पुलाजवळ एका ५६ वर्षीय इसमाचा अज्ञातांनी जबर मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना १८ मे रोजी रात्री साडेदहा ते १९ मे रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. शमशोद्दीन मियाँसाब पटेल (वय ५६, रा. दाळिंब, ता. उमरगा) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी मयत शमशोद्दीन पटेल यांचा मुलगा मोहसीन शमशोद्दीन पटेल (वय २५, रा. दाळींब) यांनी १९ मे रोजी मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शमशोद्दीन पटेल यांना १८ मे रोजी रात्री साडेदहा ते १९ मे रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दास्तपूर गावाजवळील लोखंडी पादचारी पुलाजवळ अज्ञात व्यक्तीने किंवा व्यक्तींनी अज्ञात कारणावरून जबर मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने शमशोद्दीन पटेल यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मुरुम पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मोहसीन पटेल यांच्या फिर्यादीवरून मुरुम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा आणि हत्येमागील कारणांचा शोध घेत असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक (मुरुम पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.