धाराशिव – शहरातील दत्त नगर येथे राहणाऱ्या एका ३९ वर्षीय युवकाने महिलेच्या सततच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १७ मे रोजी घडली. वाहेद अहमदअली शेख (वय ३९ वर्षे, मूळ रा. तुळजापूर नाका, धाराशिव, ह.मु. दत्त नगर, धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी सीमा मोहन विधाते (रा. शेकापूर, ता. जि. धाराशिव) या महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत वाहेद शेख यांना सीमा विधाते ही महिला काही काळापासून त्रास देत होती. तिच्या जाचाला कंटाळून वाहेद यांनी १७ मे २०२५ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दत्त नगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले.
या घटनेप्रकरणी मयत वाहेद यांचा भाऊ शाहीद अहमदअली शेख (वय ४० वर्षे, रा. तुळजापूर नाका, धाराशिव) यांनी १९ मे २०२५ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शाहीद यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सीमा मोहन विधाते हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.