मुरुम – मुरुम पोलीस ठाणे हद्दीतील दस्तापूर येथे हैदराबाद महामार्गावर १९ मे रोजी घडलेल्या शमशुद्दीन मियासाहेब पटेल यांच्या खुनाचा अत्यंत क्लिष्ट गुन्हा ४८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दाळिंब येथील ज्ञानेश्वर भोळे याला अटक करण्यात आली असून, जुन्या वैमनस्यातून हा खून झाल्याचे त्याने कबूल केले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १९ मे २०२५ रोजी सकाळी मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दस्तापूर शिवारात हैदराबाद महामार्गावर एक बोलेरो जीप संशयास्पदरित्या उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी गाडीचा अपघात झाल्याचे भासवण्यात आले होते आणि गाडीच्या शेजारी एक मृतदेह आढळून आला. मुरुम पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृताची ओळख पटवली असता, तो शमशुद्दीन मियासाहेब पटेल (रा. दाळिंब, ता. उमरगा) असल्याचे निष्पन्न झाले.
प्रथमदर्शनी, पटेल यांना घटनास्थळी मारहाण करून त्यांच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याचे दिसून येत होते. मात्र, हा खून कोणी व का केला याबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळाला भेट देऊन तपासाला सुरुवात केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेण्यात आले, परंतु सततचा पाऊस आणि अनियमित वीजपुरवठ्यामुळे तपासात मोठे अडथळे येत होते.
अशा बिकट परिस्थितीतही पोलीस प्रशासनाने हार न मानता, प्रयत्नांची पराकाष्ठा करत संपूर्ण परिसर पिंजून काढला. अत्यंत कौशल्यापूर्णपणे तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून अखेर या गुन्ह्याचा छडा लावण्यात आला. हा गुन्हा दाळिंब येथीलच दोन युवकांनी मिळून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यापैकी ज्ञानेश्वर भोळे या आरोपीला तुगाव येथून रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून जुन्या वैमनस्यातून हा गुन्हा केल्याचे सांगितले आहे. पोलीस दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरगा सदाशिव शेलार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार, मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहीफळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पोलीस अंमलदार विनोद जानराव, बबन जाधवर, नितीन जाधवर, जावेद काझी, दयानंद गादेकर, समाधान वाघमारे, चालक विजय घुगे, सुभाष चौरे, मुरुम पोलीस ठाण्याचे अन्य कर्मचारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली. या जलद तपासाबद्दल पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.