उमरगा : गंभीर आजाराची माहिती लपवून, खोटे बोलून फिर्यादी तरुणीशी विवाह करत तिची व तिच्या आई-वडिलांची फसवणूक केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २८ नोव्हेंबर २०२२ पासून गुंजोटी येथे घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी श्रद्धा हर्षल भावसार (वय ३२ वर्षे, सध्या रा. प्रभाकर नगर, बाहेरपेठ, गुंजोटी, ता. उमरगा, जि. धाराशिव, मूळ रा. प्लॉट नं १०७, टॉवर १, गोदरेज हिलसाईड १, महाळुंगे नंदे रोड, पुणे) यांनी २० मे २०२५ रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती हर्षल अरुण भावसार (वय ३३), सासू मंजुश्री अरुण भावसार (वय ६०), नणंद वैशाली रविनंदन भावसार (वय ३८) आणि दीर रविनंदन सुभाष भावसार (वय ४३, सर्व रा. बलेजा ९ फ्लोअर, ब्लॉक नं. अपार्टमेंट २, इंदिरा कॉलेज रोड, वाकड, पिंपरी चिंचवड, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी श्रद्धा यांचे पती हर्षल यांना असलेल्या गंभीर आजाराची बाब लपवून ठेवली. तसेच, खोटे बोलून श्रद्धा आणि हर्षल यांचा विवाह लावून दिला. याद्वारे फिर्यादी श्रद्धा व त्यांच्या आई-वडिलांची फसवणूक केली गेली.
या संदर्भात फिर्यादीने उमरगा येथील मा. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या जावक क्रमांक १२७०/२०२५, दि. १७.०५.२०२५ रोजीच्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) अन्वये प्राप्त आदेशानुसार, उमरगा पोलिसांनी भारतीय दंड विधान संहिता कलम ४०६ (विश्वासघात), ४१५ (फसवणूक), ४१७ (फसवणुकीसाठी शिक्षा), ४२० (फसवणूक आणि मालमत्तेचे अप्रामाणिकपणे हस्तांतरण) आणि १२० (ब) (गुन्हेगारी कट) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.